संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गौतम नगरात भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी साडे सात दरम्यान उघडकिस आली असून मृतक तरुणीचे नाव जानवी विनोद गौरखेडे वय 23 वर्षे रा गौतम नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृतक चे आई वडील हे काल बाजारात भाजीपाला घ्यायला गेले असता भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच आई वडिलांना एकच धक्का बसला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.