जर्मनी वृद्ध होतोय; मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा : एकिम फॅबिग

लोकसंख्येतील बदल : जर्मनीला कुशल कामगारांची तीव्र गरज

मुंबई :-जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत आहे. लोकांचे सरासरी वयोमान ४८ इतके झाले आहे. जर्मनीला दरवर्षी लहान सहान कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी आज येथे सांगितले. 

जर्मनीला नर्सेस, इलेक्ट्रिशिअन, आदरातिथ्य क्षेत्र व्यावसायिक, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदींची तातडीने आवश्यकता असून आपल्या मुंबईतील कार्यकाळात जर्मनीची कौशल्याची गरज व भारताकडील मनुष्यबळाची उपलब्धता याची सांगड घालण्यावर आपला भर असेल असे फॅबिग यांनी सांगितले.

यापूर्वी चेन्नई येथे वाणिज्यदूत म्हणून काम केलेल्या एकिम फॅबिग यांची जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्यदूत पदी नियुक्ती झाली असून सोमवारी (दि. ३) त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जर्मनीच्या ८०० कंपन्या आज भारतात काम करत असून त्यापैकी किमान ३०० कंपन्या पुणे येथे असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीतुन येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीतील महाराष्ट्रात काम करीत असलेल्या कंपन्या राज्यात खुश असून त्यांना कुठल्याही समस्या नसल्याचे फॅबिग यांनी सांगितले. जर्मनीने मुंबई तसेच नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

आज ३५००० भारतीय विद्यार्थी जर्मनी मध्ये शिकत असून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या बर्लिनमध्ये १७००० भारतीय आयटी तंत्रज्ञ राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी जर्मनीला २०० नर्सेसची आवश्यकता असून त्या दृष्टीने केरळ येथील एका नर्सिंग कॉलेजशी करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कसायांची आवश्यकता

केवळ मोठे कौशल्य असलेल्या लोकांचीच नव्हे तर लहान सहान कौशल्ये असलेल्या लोकांची देखील जर्मनीला आवश्यकता असून अलीकडेच पुणे येथून कसायाचे काम करण्यासाठी ७ लोकांना जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी साठ कसाई कामगारांची जर्मनीला आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताशी आर्थिक व राजकीय संबंध वृद्धिंगत करण्याशिवाय जर्मनी भारतीयांसाठी प्रवास सुलभीकरण, सांस्कृतिक सहकार्य व विशेषतः चित्रपट सृष्टीशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीचा मुंबईतील व्हिजा सेक्शन जगातील तिसरा मोठा असून लवकरच तो जगातील सर्वात मोठा व्हिजा सेक्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बायर्न म्युनिक फुटबॉलचा प्रचार प्रसार करणार

भारतात फुटबॉल प्रचलित करण्यासाठी जर्मनीचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक देशाच्या ग्रामीण भागात फुटबॉल प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनी येथील विविध विद्यापीठांमध्ये संस्कृत शिवाय मराठी, तामिळ भाषा शिकविणारे विभाग देखील असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीच्या वाणिज्यदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपालांनी दोन देशांच्या विश्वासाच्या संबंधांना उजाळा दिला. शाळेत शिकत असताना आपल्या शाईच्या पेनाची निब ‘मेड इन जर्मनी’ असायची अशी आठवण सांगून जर्मनीची सध्याची कौशल्याची गरज पुरविण्यासाठी महाराष्ट्र निश्चितच मदत करेल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्रात नव्यानेच राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले असून जर्मनीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य केल्यास त्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल असे राज्यपालांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अस्थीव्यंगाच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Tue Apr 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन जवळील आलम नगर रहिवासी 74 वर्षीय वृद्धाने स्वतःला असलेल्या अस्थीव्यंगाचा त्रासासह पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून शेजारच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे चार दरम्यान घडली असून मृतक वृद्धाचे नाव विठ्ठल इडपाती वय 74 वर्षे रा.आलम नगर कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!