नागपूर :- कडाक्याच्या उन्हातही शेकडो कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गडकरींची पूर्व नागपुरातील लोकसंवाद यात्रा गाजली. जवळपास साडेपाच तास चाललेल्या या यात्रेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचे जागोजागी दमदार स्वागत झाले.सतरंजीपुरा येथील सुनील हॉटेल समोर लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी नगरसेवक बाल्या बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे नेते सुरज गोजे, माजी नगरसेवक चेतना टांक यांची उपस्थिती होती. पूर्व नागपुरातील प्रत्येक वस्तीमध्ये ना. श्री. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा पोहोचणार म्हणून उत्साहाचे वातावरण नव्हते. जागोजागी गडकरींच्या स्वागताचे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले होते.अनेक ठिकाणी पूर्व नागपूरला विविध योजनांचा लाभ दिल्याबद्दल गडकरींचे आभार मानणारे फलक उंचावण्यात आले होते. महिलांनी रस्त्यावर सुरेख रांगोळ्या साकारल्या होत्या. माजी नगरसेवक जगतराम सिन्हा यांनी ‘कलयुग के विकास पुरुष – नितीनजी गडकरी’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक लावले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी गडकरींचे जोरदार स्वागत केले. भारत चौकात गडकरींना क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार भेट करण्यात आला. याठिकाणी शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते. भवानी माता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देखील ना. गडकरींचे अतिशय उत्साहात स्वागत केले. सतरंजीपुरा चौकातून सुरू झालेली यात्रा मारवाडी चौक, प्रेमनगर चौक, कालीमाता मंदिर, भरतवाडा चौक, मोठा सिमेंट रोड, श्याम नगर या मार्गाने पारडी येथील हनुमान मंदिर येथे पोहोचली व याठिकाणी यात्रेचा समारोप झाला.