– अतिरिक्त आयुक्तांकडून बिशॉप कॉटन स्कूलच्या मैदानात पाहणी
नागपूर :- नागपूर शहरातील घराघरातून कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी नियुक्त ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. कंपनीच्या सर्व कचरा गाड्यांची अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शुक्रवारी (ता.३१) बिशॉप कॉटन शाळेच्या मैदानावर तपासणी केली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीखाली मनपाद्वारे घरघरातून कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी नियुक्त मे. ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या संपूर्ण वाहनांची तपासणी एकाच वेळी करण्यात आली.
आंचल गोयल यांनी मैदानावर झोन निहाय-प्रभाग निहाय रांगेत लागलेल्या वाहनांमधील सार्वजनिक सुचना व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट, घातक कचरा गोळा करण्यासाठी रेड बॉक्सची व्यवस्था इत्यादी बाबींची तपासणी केली. पहिल्यांदाच नागपूर महानगरपालिकेतर्फे वाहनांची एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. ज्या वाहनांमध्ये कमतरता आढळली त्या वाहनांना दुरुस्त करायचे निर्देश सुध्दा अतिरिक्त आयुक्तांनी दिले. यावेळी दोन्ही कंपन्यांच्या घराघरातून कचरा संकलित करणाऱ्या ३७९ (ए.जी. १९१ व बी.व्ही.जी. १८८) वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३३८ वाहनांमध्ये सुका कचरा तर ३३६ वाहनांमध्ये ओल्या कचऱ्यासाठी कंपार्टमेंट आहे. ३१८ वाहनांमध्ये रेड डस्टबीन लावण्यात आले आहे. ३१५ वाहनांना टॉप कव्हर आहे तर २२७ वाहनांवर सार्वजनिक सूचना व्यवस्था लावण्यात आली आहे. ३३५ वाहनांची व्यवस्थित रंगरंगोटी करण्यात आल्याचेही यावेळी निदर्शनास आले. स्वीपिंग व्हेईकलची संख्या ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडे ३२ तर बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड यांचेकडे २३ आहे. तर ए.जी. कडे ५१ आणि बी.व्ही.जी. कडे ३६ अन्य स्वच्छता वाहन असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 525 वाहन आहेत.
मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन आणि नेहरूनगर झोन या पाच झोन क्षेत्रातील घराघरातील वर्गीकृत कचरा संकलित करुन वाहतूक करण्याची जबाबदारी आहे. तर बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड कंपनीकडे गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, अशीनगर झोन आणि मंगळवारी झोन या पाच झोन क्षेत्रातील घराघरातील वर्गीकृत कचरा संकलित करुन वाहतूक करण्याची जबाबदारी आहे. वाहनांच्या तपासणी प्रसंगी लोकेश बासनवार, रोहीदास राठोड सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी, कचरा संकलित करणाऱ्या कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.