नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
दीक्षाभूमी परिसरात स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी वंदन केले. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आमदार प्रवीण दटके, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम, आंतरराष्ट्रीय न्यूरॉलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ही बहुमूल्य भेट आहे. येणाऱ्या अनेकानेक पिढ्यांना भविष्याची आदर्श मार्ग संविधानाने सुरक्षित आणि सुलभ केलेला आहे. भारतीय संविधान हा स्वतंत्र भारताचा महत्वपूर्ण दस्तावेज आहे, असे ना. नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला जगातले सर्वात मोठे संविधान देऊन विविधतेने नटलेल्या भारत देशाला अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांची विद्वत्ता आणि दूरदृष्टी यामुळे देश निरंतर आदर्श राष्ट्र म्हणून मार्गक्रमण करत राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.