विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमाखदार समारोप
नागपूर – शहरात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा आज थाटात समारोप झाला. पुढील स्पर्धा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज समारोप कार्यक्रमप्रसंगी केली. सांघिक विजेतेपद गडचिरोली जिल्ह्याने पटकावले.
25 फेब्रुवारीपासून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १२०० स्पर्धकांनी ८१ क्रीडा प्रकारात तीन दिवस आपले क्रीडा कौशल्य सादर केले. या स्पर्धेचा समारोप आज झाला. या समारोपीय कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, भंडा-याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बिदरी पुढे म्हणाल्या की, पुढील विभागीय क्रीडा व महसूल स्पर्धेच्या आयोजनाची चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे पुढील स्पर्धा चंद्रपूरात आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी औपचारिकरित्या स्पर्धेचे ध्वज हस्तांतरण चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांकडे करण्यात केले.
यंदाच्या स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आले. कुठल्याही प्रकारची तक्रार स्पर्धेदरम्यान तक्रार निवारण समितीकडे नोंदविण्यात आली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी स्पर्धेत सहभागी झाल्याचे बिदरी पुढे म्हणाल्या. अतिशय व्यावसायिक पद्धतीने सर्व सोयी सुविधांसह कोणत्याही तक्रारीविना भव्य दिव्य आयोजनाबद्दल त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचे यावेळी कौतुक केले.
विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळाले. सांघिक गटात गडचिरोलीने क्रिकेट, कबड्डी, खो-खो (पुरुष), खो-खो महिला , व्हॅालिबॅाल, थ्रो बॅाल (महिला) गटात प्रथम क्रमांक मिळवला. तर फुटबॅाल, मार्च पास्ट आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नागपूरने अव्वल स्थान पटकावले. तथापि,सांघिक गटात चंद्रपूरने दुसरे तर नागपूरने तिसरे स्थान पटकावले.
नागपूर विभागातील सर्वच जिल्हाधिका-यांनी तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या प्रतिनिधींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले स्पर्धेदरम्यानचे अनुभव सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार सहायक आयुक्त हरीश भांबरे यांनी मानले.