– विद्यापीठाच्या नावलौकिकात भर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले अभिनंदन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार रॉय यांचे कार्य व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून पोलंड येथे सुरु आहे. त्यांच्या संशोधनाच्या कार्याची दखल घेत अमेरिकेच्या स्टेनफोर्ड विद्यापीठामध्ये दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वैज्ञानिक म्हणून त्यांना यादीत स्थान देण्यात आले आहे. ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब असून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल व डॉ. रॉय यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. महेंद्रकुमार रॉय यांनी त्यांच्या महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. त्यांचे संशोधनाच्या क्षेत्रातील समर्पण व त्यांच्या पायाभरणी कार्यामुळे वैज्ञानिक समुदयासाठी नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. सद्यस्थितीत पोलंड येथील निकोलस कोपर्निकस विद्यापीठात व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून डॉ. रॉय कार्यरत असून त्यांच्या संशोधनाने जैवतंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा विस्तार केला आहे. त्यांच्या संशोधनामुळे अनेक पेटंटचा विकास झाला असून संशोधन क्षेत्रातील उद्गाते म्हणून त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले आहे.
डॉ. महेंद्रकुमार रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या जीवतंत्रशास्त्र विभागातील त्यांचे विद्यार्थी डॉ. अनिकेत गादे व डॉ. अविनाश इंगळे यांना सुद्धा नेत्रदीपक यश प्राप्त करत स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या दोन टक्के शास्त्रज्ञाच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. सद्यस्थितीत अमरावती विद्यापीठाच्या जीवतंत्रशास्त्र विभागातील डॉ. अनिकेत गादे हे सहयोगी प्राध्यापक म्हणून जैविक विज्ञान व जैवतंत्रज्ञान विभाग, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी रासायनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रगत करण्याचे विविध पेटंट मिळविले आहेत. डॉ. गादे यांच्या शैक्षणिक आणि संशोधनातील कार्याच्या योगदानामुळे वैज्ञानिक समुदाय समृद्ध झाला असून त्यांच्या संशोधनाचा व्यावहारिक उपयोग करण्याचा मार्गही मोकळा झाला. तसेच डॉ. अविनाश इंगळे हे रामानुजन फेलो, जैवतंत्रज्ञान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत असून त्यांचे विविध शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. इंगळे यांचे विविध पेटंट असून आचार्य पदवीकरीता संशोधन करीत असलेल्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शक म्हणून ते संशोधक निर्मितीच्या कार्यात उत्कृष्ट काम करीत आहेत.
जीवतंत्रशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार रॉय, विभागातील डॉ. अनिकेत गादे व डॉ. अविनाश इंगळे यांना जागतिक नामांकन प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.