नागपूर :- वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुनगंटीवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.
वन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबविण्यात येणा-या योजना, उपक्रमांची माहिती यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समृद्ध वारसा, तसेच गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. लवकरच याबाबत तज्ज्ञांची परिषद घेण्यात येईल. मराठी चित्रपट व कला क्षेत्रासाठी 75 ठिकाणी चित्रनाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी शासन करत असलेले प्रयत्न, मदत, फिल्मसिटीचा कायापालट करण्यासाठीचे नियोजन आदी विविध विषयांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.