नागपूर :- मकर संक्रात म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यानाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो. याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित ठिकाणी व वीजयंत्रणेपासून दूर राहून पतंग उडवावेत.
वीज यंत्रणेत मांजा अडकण्याची शक्यता
शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेत अडकण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या साहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरू असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीज यंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते- अजाणतेपणी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते.
धातू मिश्रित मांजा ठरू शकतो घातक
सध्या बाजारात धातू मिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असते असा मांजा वीजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून वीज प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करण्यचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
पालकांनी दक्ष राहावे
नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडवण्या बाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयल करू नये, मागिल वर्षी पतंगीमुळे महान मुलांच्या अपघाताच्या पाच घटना सामोरे आल्या होत्या, त्यापैकी जरिप्टका ठाण्यांतर्गत समतानगर येथे वीज तारांमधील अडकलेला पतंग लोखंडी सळाखीच्या मदतीने काढण्याच्या प्रयत्नात एका दहा वर्षीय मुलाला वीजेचा शॉक लागून तो 45 टक्के भाजला होता, यात या बालकाचा पाय कापावा लागला होता, सोबतच हात आणि पाय निकामी झाले होते, अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी विशेष कबरदारी घेणे आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवा
· वीज तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.
· तारेत अडकलेला पतंग काढण्याचा अट्टहास करू नये.
· वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नये.
· अडकलेले पतंग किंवा मांजा काढायला रोहीत्रावर चढू नये.
· धातू मिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.
· दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नका.
· पतंग उडविणाया पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे.
अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा. तातडीच्या मदतीसाठी 24 तास सुरू असलेल्या महावितरणच्या 1912 / 18002123435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.