संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17 :- नुकतेच काही दिवसापूर्वी 5 सप्टेंबर ला रणाळा येथे जयभीम चौक रहिवासी 85 वर्षीय कांताबाई गोंडाने नामक महिलेची कोरोनाचे पैसे मिळणार असे आमिष देऊन 28 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच काल दुपारी 12दरम्यान दोन भामट्या महिलानी एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला 5 हजार रुपये महिना पगार मिळणार असे आमिष देऊन तिच्या गळयातील व कानातील सोन्याचे दागिने किमती 24 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून फसवणूक झालेल्या महिलेचे नाव शकुंतला भानुदास शंभरकर रा भीमनगर कामठी असे आहे.यासंदर्भात पीडित फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात महिले विरुद्ध भादवी कलम 420,170,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी वृद्ध महिला ही स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक मधून पायदळ जात असता दोन अज्ञात आरोपी महिला ह्या तीन चाकी ऑटो मध्ये बसून येऊन स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे बतावणी करून सरकार कडून प्रति महिना 5 हजार रुपये महिना मिळणार असल्याचे आमिष देऊन फोटो काढतेवेळी तुमच्या गळयात असलेली सोण्याची साखळी व कानातले टॉप्स दिसल्यास महिना लागू होणार नाही असे सांगून तिचे सोन्याचे दागिने काढून घेत तिला ऑटो मधून खाली उतरवून 24 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केली यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.