Ø उद्योग, कृषी, रेशीम, मत्स्यव्यवसाय, खनीज व पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना
नागपूर :- विभागातील सर्व जिल्ह्यांनी विकासाची बलस्थाने, उत्कर्षाच्या संधी तसेच विविध क्षेत्रातील समतोल विकास व त्यासंदर्भात येणाऱ्या संभाव्य अडचणींचा व उनिवांचा अभ्यास करून जिल्ह्याचा विकास आराखडा येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तयार करावा व या आराखड्यास 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा नियोजन समितीची मान्यता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वसमावेषक जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. बैठकीस सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग तसेच एम्सचे अधिकारी उपस्थित होते.
देश विकसित करण्यासाठीचे 2047 पर्यंतचे लक्ष्य ठरविण्यात आले असून त्यादृष्टीने वेगवेगळ्या टप्प्यात विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवर विकास आराखडे तयार करावयाचे आहेत. त्याअंतर्गत अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे स्पष्ट उद्दिष्ट ठरवायचे आहे. विभागातील जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनात सर्व क्षमतांचा समावेश करण्यासाठी विषयतज्ज्ञ, सामाजिक संस्था व नागरिकांच्या सूचना व मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश आयुक्त बिदरी यांनी दिले.
जिल्हा विकास आराखडा तयार करतांना विभागातील उद्योग, कृषी, रेशीम, मत्स्यव्यवसाय, खनिजे, वनउपज व पर्यटन या विकासाच्या बलस्थानांवर विशेष लक्ष देण्याचे व वर्षनिहाय प्रगती, सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) व दरडोई उत्पन्नातील वाढ दर्शविण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
नागपूर विभागात उद्योग क्षेत्रात आतापर्यंत एकूण 60 हजार कोटीची गुंतवणूक झाली असून अजून 98 हजार कोटी गुंतवणूक अपेक्षीत आहे. केवळ मागील वर्षभरात महत्वाच्या क्षेत्रात 59 कोटी 50 लक्ष गुंतवणूक झाली आहे. विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने उद्योजकांना विद्युत देयक व जागाभाडे यामध्ये सवलत देण्याचे नियोजन करणे, क्लस्टर विकसित करून छोटे उद्योग बळकट करणे, बँकाकडून उद्योगासाठी कर्ज सुविधा तत्परतेने मिळविणे, वैद्यकीय सुविधा देणे, ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या शासनाच्या प्रोत्साहनात्मक योजनेंतर्गत नेमून दिलेल्या संत्रा, हळद, भातपीक, सिमेंट, वनउपज, बांबू, कापूस व खनीज आदी उत्पादनांच्या व्यापक विक्रीसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविणे, पॅकेजिंगचे प्रशिक्षण तसेच ब्रँडिग करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. विपीन इटनकर, योगेश कुंभेजकर, संजय मीणा, विनय गौडा, चिन्मय गोतमारे, राहूल कर्डिले यांनी अनुक्रमे नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व वर्धा जिल्ह्याचे सादरीकरणे केले. तर उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी विभागातील उद्योगांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व विषयाची संक्षेपात माहिती दिली.