१ ते ८ ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन – आर.विमला

– प्रदर्शनात ५० स्टॉल्स ; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नागपूर :- महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दि. १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूरच्यावतीने खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या उपस्थितीत दि.१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके उपस्थित होते.

खादी पासून निर्मित विविध कापडांचे २५ स्टॉल्स या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार असून महात्मा गांधी जयंतीच्या औचीत्याने खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खादीच्या वस्तूंवर २० टक्के सवलत असणार आहे. या सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मध केंद्र योजना योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध झालेल्या उद्योजकांचेही स्टॉल्स राहणार आहेत.

या प्रदर्शनात महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, मेणबत्ती आदी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.

ग्रामीण उ‌द्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या असे आवाहन,आर विमला यांनी केले आहे.

दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीड दिवसांचे श्रीगणेशाच्या १२७४ मूर्तींचे विसर्जन  

Thu Sep 21 , 2023
– झोननिहाय ३२ विसर्जन स्थळे : सर्वाधिक विसर्जन धरमपेठ झोनमध्ये नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात प्रत्येक झोनमध्ये विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (ता.२१) शहरातील विविध विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे. दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे झोननिहाय ३२ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १२७४ मूर्तींचे विसर्जन झालेले आहे. मनपा आयुक्त तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com