नागपूर :- १८ ऑक्टोबर पासून आपल्या प्रमुख चार मागण्यांना घेऊन राज्यभरातील आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. वारंवार पत्रव्यवहार करून व बैठका करून तसेच ३ ऑक्टोंबर रोजी राज्यभर चेतावणी आंदोलन करून सुद्धा तोडगा न निघाल्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने संपावर जाण्याच्या निर्णय घेतला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागातील संबंधित काम १८ तारखेपासून ठप्प करून महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. १८ तारखेपासून सतत संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन चालत असून शासन मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कृती समितीने तीव्रता वाढवण्याच्या सूचना दिल्यामुळे ९ व्या दिवशी २६ तारखेला व्हेरायटी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.जेव्हा पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन सतत चालू राहणार अशी माहिती कॉ. राजेंद्र साठे यांनी दिली. शासनातर्फे परिपत्रक काढून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कार्यमुक्त करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. परंतु सरकारच्या धमकीला न घाबरता राज्यातील ७४ हजार आशा वर्कर व ४ हजार गटप्रवर्तक जेव्हा पर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा होत नाही व आमच्या मागण्या मान्य करत नाही. तेव्हापर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली आहे.
दिवाळी बोनस ५ हजार रुपये देण्यात यावा,२६ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये देण्यात यावे, रिटायरमेंट नंतर १० हजार रू. महिना पेन्शन देण्यात यावी, गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना बरोबर समायोजन करण्यात यावे, अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे आशा सुपरवायझर नामोल्लेख करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या देण्यात यावा. अशा विविध मागण्यांना घेऊन आज सी आय टी यू तर्फे संविधान चौकात कॉ.राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम, कॉ.रंजना पौनिकर, कॉ.लक्ष्मी कोत्तेवार यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. धन्य आंदोलनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन उपमुख्यमंत्री यांचे सोबत रविवारी सिटूच्या शिष्ट मंडळाची चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.तसेच विविध रुग्णालयातील सफाई कर्मचारी सुद्धा आशा वर्कर बरोबर १८ तारखेपासून संपामध्ये उतरलेले आहेत. त्यांचे शिष्ट मंडळ जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर डवले यांना भेटून मागण्याचे निवेदन सादर केले.