जळगाव शहर व जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक पार…
जळगाव :- आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे… आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा… येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतला.
महाराष्ट्रातील युवक सरकारवर नाराज आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प सरकारच्या हातून गेला आणि तरुणांच्या हातून रोजगारही गेला. केंद्रसरकारनेही रोजगाराची निर्मिती केली नाही, त्यामुळे देशभरात बेरोजगारीची संख्या वाढली, महागाई वाढली आहे. लोकांना बोलू देत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे त्यामुळे या सर्वांचा स्फोट कधी होईल सांगता येत नाही. लोक आपल्याला भरभरून देण्याच्या तयारीत आहेत. आपण आपला पदर मोठा करायला हवा. संघटना मोठी झाली, सभासद नोंदणी चांगली झाली तर ते शक्य होईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
प्रत्येकाने पक्ष वाढवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त कार्यशील सदस्यांची नोंद कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. लोक १० रुपयाची पावती फाडतात आणि मनाने काम करतात अशा लोकांपर्यंत पोहोचा आणि सभासद नोंदणी यशस्वी करा. निवडणुकांसाठी फार कमी अवधी राहिला आहे. आपण सध्या सरकारमध्ये नाही याची कल्पना आहे पण या वेळेत आपण जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचू याचा मला विश्वास आहे. जो जास्त काम करेल त्यालाच पक्षात स्थान दिले जाईल. त्यामुळे प्रामाणिकपणे सभासद नोंदणी करा. या मोहिमेत मला थोडाही ढिसाळपणा चालणार नाही, सर्वांनी यात उत्साहाने सहभागी व्हा असे आवाहनही जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
आज राज्यात सत्तांतर झाले आहे. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांवर लोकांचा जास्त विश्वास आहे, आपुलकी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार सतिश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख,माजी आमदार दिलीप वाघ, रोहिणी खडसे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.