संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– धम्मचक्र प्रवर्तन दिनी झाली होती पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी 5 लक्ष 11 हजार 500 रुपयांची घरफोडी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरानगर रहिवासी व जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे कार्यरत बारलिंगे नामक पोलीस कर्मचाऱ्याच्या कुलूपबंद घरातून धम्मचक्र प्रवर्तन दिनी 24 आक्टोबर ला रात्री साडे नऊ दरम्यान अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून 65 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रूपयाची घरफोडी केली होती यासंदर्भात फिर्यादी पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत बारलिंगेने नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला होता.या घटनेला आज एक महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी लोटून गेला तरीही पोलिसांना सदर घरफोडीचा छडा लावून आरोपीचा शोध लावण्यात यश आले नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.तसेच सदर घटनेसंदर्भात पोलिसाच्या घरफोडी संदर्भात पोलिसांचा असा वेळकाढूपणा धोरण असेल तर सर्वसामाण्यांनी पोलिसांशी अपेक्षा करावी तरी कशी?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.
‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे भक्षण करणाऱ्या पोलिसांच्याच घरी चोरट्यानी चोरीचा डाव साधला .यावरून पोलिसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील.त्यातही एक महिना लोटूनही एका पोलिसाच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करू न शकणाऱ्या पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका पडला आहे.
फिर्यादी पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत बारलिंगे हे जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कर्तव्यावर हजर असताना धम्मचक्र प्रवर्तन दिनी घरमंडळी घराला कुलूप कोंडा लावून घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यानी घरात कुणी नसल्याची संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीचे लॉक तोडून लॉकर मधील नगदी 65 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने व एटीएम कार्ड असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. मात्र चोरट्याचा अद्यापही शोध लागलेला नाही हे इथं विशेष!