विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा : वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे वरळी सी फेस येथे उद्घाटन
मुंबई : राज्य शासनाने कोविड काळातही विकासकामांमध्ये खंड पडू न देता सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी केली आहे. राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रातिनिधिक सचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून योजना व विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वरळी सी-फेस, कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री ठाकरे व मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, संचालक गोविंद अहंकारी, संचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, कोविड-19 सारख्या महासंकटासोबतच महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींचा सामना करत राज्य शासनाने विकासकामांमध्ये सातत्य ठेवत चांगली कामगिरी केली. कोविड कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था कार्यान्वित ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. राज्य शासनाच्या या कामगिरीस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शन सारखे उपक्रम महत्वाचे आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या विभागीयस्तरावर आयोजित प्रातिनिधिक प्रदर्शनांना नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले.
राज्याच्या कामाबाबत कौतुक : वस्त्रोद्योग मंत्री शेख
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख म्हणाले, कोविड-19 सारख्या कठीण काळातही महाराष्ट्र प्रगती करत राहिला. कोविड काळात राज्याने केलेल्या उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरनेही कौतुक केले आहे. मुंबईने देशाच्या विकासात नेहमीच मोठा हातभार लावला आहे. मुंबईची ही तत्परता या संकटकाळातही पुन्हा देशाने पाहिली.
प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित केलेले हे सचित्र प्रदर्शन राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती नक्कीच लोकांपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वासही मंत्री शेख यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनाचे फित कापून दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनस्थळी प्रारंभी प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे हे प्रदर्शन दि. १ ते ५ मे या कालावधीत सर्वसामान्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.