मनपाच्या निरामय जीवनशैली कार्यशाळेला उदंड प्रतिसाद
नागपूर :- ताण तणाव हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे मोठे माध्यम आहे. आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात असते ती वाढविण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा, आत्मविश्वासू रहा. जगण्यात सकारात्मकता आणून काम करण्याचा उत्साह वाढवा, असा सल्ला मोटिवेव्हेशनल स्पीकर व आरोग्य विषयक मार्गदर्शक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी मनपासह शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना दिला.
नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरामय जीवनशैली कार्यपद्धतीबद्दल डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.१६) आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.
याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांची विशेष उपस्थिती होती. मंचावर नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेंद्र बगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके उपस्थित होते. कार्यशाळेत डॉ. हेमंत ओत्सवाल यांनी ‘निरामय जीवनशैली कार्यपद्धती’ विषयावर सविस्तर विवेचन केले. या विषयावरील हे ६९१ वे सत्र असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. त्यांनी उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधूमेह या तीन महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. भारतात ११ लाख लोकांचा कार्डियो व्हॅस्कूलरने मृत्यू असून हा आकडा देशात सर्वात जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. कोलेस्ट्रॉल, दमा, लठ्ठपणा, डायबेटिज, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, महिलांना मासिक पाळी जाताना होणारा त्रास, ब्रेस्ट कॅन्सर हे सर्व रोग कसे होतात, त्याची कारणे, उपाय व निदान याविषयी डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी सादरीकरणाद्वारे तसेच विविध उदाहरण देऊन माहिती दिली. निरामय जीवनशैलीमध्ये योग, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचे महत्व त्यांनी पटवून दिले.
शिरा (veins) आणि धमन्या (arteries) यामुळे शरीराला रक्तपुरवठा कसा होते, रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यास हृदयविकार कसे होतात, शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास ते किती धोकादायक ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन केले. हे सर्व रोग शरीराला कसा आला आळा घालतात आणि आपण रोग होण्याआधीच स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो याविषयीचा सल्ला त्यांनी दिला. संशोधनाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले, भारतात ३२ टक्के लोकांना उच्च रक्तदाब आहे. मात्र हे त्यांना माहितीच नाही. ६० टक्के लोक व्यायाम करीत नाहीत आणि २५ टक्के लोक झिरो सिडेंटरी जीवन जगतात आणि शरीराला दुर्लक्ष केल्यामुळे आजाराला निमंत्रण देतात असेही ते म्हणाले. नवीन पिढीमध्ये मानसिक तणाव होऊन आत्महत्यचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक माध्यमांमुळे देखील लोकांच्या जीवनात तणाव वाढत असल्याचे ते बोलले. विविध मानसिकतेविषयी त्यांनी समजावून सांगितले. काही मनोवृत्ती आपल्या आयुष्यात तणाव आणून आपले जगणे कसे कठीण करते याचे उदाहरण त्यांनी दिले.
डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी जगभरात मोठमोठ्या डॉक्टरांनी केलेले रिसर्च दाखवले त्यातून जीवनात आनंदी कसे राहता येईल याचा मार्ग दाखविला. वाढत वय किंवा असाधारण आजाराला सकारात्मकतेने सामोरे जा. घरातील स्त्री आनंदी आणि सकारात्मक असेल तर घरही निरोगी राहते असे देखील ते म्हणाले. जीवनशैलीतील बदल, सुदृढ आहार, आनंदी राहण्याचे उपाय, योग, व्यायामाचे महत्व या सगळ्याविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच शरीराची नियमित तपासणी करत राहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
प्रास्ताविकामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. महानगरपालिकेत कामाचा येणारा ताण दूर करायला अनेकदा कर्मचा-यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाते. सरकारी नोकरी असली कि, नागरिकांना सेवा पुरविणायची जबाबदारी वाढते अशा वेळेस तणाव कमी करून प्रॉडक्टीव्हीटी वाढविण्याची गरज असते. जगण्यात सकारात्मकता आणून काम करण्याचा उत्साह कसा वाढेल हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते, असे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा व्यवस्थापक राधाकृष्णन बी. म्हणाले.
कार्यशाळेत उपायुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
संचालन क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर यांनी केले. आभार उपायुक्त निर्भय जैन यांनी मानले.