– ग्रामीण भागातील मुलांनी साकारलेले ‘क्यूं आज कल’ गाणे लोकप्रिय
यवतमाळ :- येथील तरूणांनी एकत्र येत बनविलेल्या हिंदी गाण्यांच्या अल्बमवर सध्या तरूणाईच्या उड्या पडत आहेत. स्थानिक कलावंतांनी उपलब्ध साधनांत चित्रित आणि प्रदर्शित केलेला ‘क्यूं आज कल’ हा अल्मब या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या ग्रामीण प्रतिभावंत कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
ग्रामीण कलावंतांची तळमळ बघून स्थानिक तुळजा नगरीतील अविनाश घाटे या तरूणाने या अल्बम निर्मितीचे आव्हान पेलले. त्यांना दिव्या भगत यांनी सहकार्य केले. दिव्या म्युझिक मेकर्स यांनी सादर केलेल्या ‘क्यूं आज कल’ या अल्बममधील हिंदी गाण्यावर सध्या तरूणाई फिदा झाली आहे.यातील सर्व कलावंत यवतमाळ, पुसद परिसरातील आहेत. या अल्बममधील गाण्याचे चित्रीकरण यवतमाळसह पुसद, नागपूर परिसरात झाले. सामाजिक कार्यातून फुललेली हळवी प्रेमकथा अशा आशयाचे या अल्बममधील कथानक आहे.
दिव्या भगत हिचीच संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये दिव्यासह कार्तिक कोळपे याने अभिनय केला आहे. गीत सचिन हाके याचे असून, अमन सोनी हा संगीतकार आहे, तर सीएनयु बीट्सचे संगीत आहे. आर. कौशल आणि दिव्या मल्लिका यांनी हे बहारदार गाणे गायले आहे. अरूण कौलगुरू यांनी छाया दिग्दर्शन केले. येथील नंददीप फाऊंडेशनचेही या अल्बमसाठी सहकार्य मिळाले आहे. ‘क्यूं आज कल’ या अल्बमला यु-ट्युबवर तरूणाईकडून प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे या ग्रामीण कलावंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.