डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशनाच्या कार्यासाठी अधिकचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

   मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मराठी अनुवादित खंडाच्या माध्यमातून त्यांचे विचार ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी भाषेतल्या २२ खंडांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे काम समितीने युद्धपातळीवर करावे. या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या खंडामध्ये डॉ. आंबेडकरांचे ‘पीएचडी.’च्या ‘ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती’ आणि ‘डी.एससी.’च्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या शोध प्रबंधाचे मराठीत भाषांतर केले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे या कार्यासाठी अभिनंदन केले.

            या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, सदस्य डॉ. प्रज्ञा पवार, सहसंचालक डॉ. सोनाली रोडे, सदस्य धनराज कोहचाडे, दुरदृश्यप्रणालीद्वारे एन जी कांबळे, एम एल कासारे, गिरीराज बागुल आदीसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, समाजातल्या सर्व घटकांना समान न्याय, विकासाची समान संधी मिळावी तसेच, सर्व जाती, धर्म, पंथांच्या, प्रांताच्या, विचारांच्या व्यक्तींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रथा-परंपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य घटनेद्वारा डॉ. आंबेडकर यांनी दिले आहे. या स्वातंत्र्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. देशाचा कारभार डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या आधारानेच चालला पाहिजे. या पद्धतीने कार्य करण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपली आहे.

             डॉ. आंबेडकरांचे चरित्र, त्यांचे विचार, लेखन मराठीतून तसेच डिजीटल माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहाचविण्याचे कार्य ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समिती’ने पार पाडावे.

            डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करताना माझ्यावरची जबाबदारी वाढत असून, वंचित उपेक्षितांच्या हिताचाच निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून जनहितार्थ निर्णय भविष्यात घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            समितीचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले, १५ मार्च १९७६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली असून, तेव्हापासून हे साहित्य जगभर पोहोचले आहे. समितीने लेखन आणि भाषणाचे २२ खंड, सोर्स मटेरियलचे ३ खंड प्रकाशित केले आहे. यावर्षी जुलै 2021 मध्ये आपण प्रकाशन समितीची पुनर्रचना केली आणि सहा महिन्यात, सहाव्या मराठी अनुवादाचा खंड प्रकाशित होत आहे.

            ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी आपल्या शोध प्रबंधात नेमकी काय भूमिका मांडली, त्यांचे या प्रबंधातील विचार आजही कसे प्रासंगिक आहेत, हे आपल्या मातृभाषेत समजून घेण्याची संधी या निमित्ताने मराठी वाचकांना व अभ्यासकांना मिळणार आहे. सर्व ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Fri Dec 17 , 2021
  मुंबई  : महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.             आज मंत्रालयात फिल्मसिटी संदर्भातील आढावा बैठक‍ आयेाजित करण्यात आली होती. या बैठकीला गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आदी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!