– कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे आयोजन
यवतमाळ :- कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक व सेंद्रीय शेती या विषयावर दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॅा.सुरेश नेमाडे होते.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, विषय विशेषज्ञ डॅा.प्रमोद मगर उपस्थित होते. डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळविण्याकरिता शेतकरी स्वतःमध्येच स्पर्धा करीत आहेत. या स्पर्धेमुळे रसायनांचा अतोनात वापर होत आहे. हा वापर शास्त्रज्ञांनी सुचवलेल्या मर्यादेपेक्षा खुप जास्त आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील त्याच प्रमाणात दिसून येत आहेत. या रसायनांच्या अतिवापरावर आळा घालण्यासाठी नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आधार घेऊन आपल्या शेतीच्या आरोग्याची निगा राखावी, असे सांगितले.
आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. रसायनांऐवजी जैविक निविष्ठांच्या वापराकडे लक्ष केंद्रीत करून त्याचा भरपूर प्रमाणात वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविकात डॉ. प्रमोद मगर यांनी रसायनाच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस विषबाधेच्या तक्रारी वाढत आहेत. जैविक निविष्ठा बनविणे सोपे असून ते तयार करण्याकरिता लागणारा खर्च सुद्धा खुप कमी आहे व त्यापासून होणारा फायदा कालांतरापर्यंत टिकून राहणारा आहे. जैविक निविष्ठांमध्ये जीवामृत, बिजामृत, घन जीवामृत, निमास्त्र, ब्रम्हास्त्र, दशपर्णी अर्क कसे तयार करायचे व त्याचा वापर कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. आभार शिवानी बावनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राधेश्याम देशमुख, भरतसिंग सुलाने, प्राची नागोशे, नयन ठाकरे, रवींद्र राठोड यांनी परिश्रम घेतले.