संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासनाने लोककल्याणकारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 1 जुलै पासून अंमलात आणली आहे.या योजनेचा लाभ घेताना कोणत्याही माता भगिनींनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना देवाण घेवाणीच्या आमिषाला बळी पडू नये ,जर आपणास कोणी पैश्याची मागणी करीत असेल तर त्यांच्या विरोधात थेट अधिकाऱ्याकडे तक्रार करावी असे आवाहन कढोली ग्रा प चे माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी केले आहे.
या योजनेद्वारे वर्षाला 2.5 लाख रुपये कमी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1500 रुपये मिळणार आहे.शासनाच्या सुधारित निकषामुळे वय 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.पात्र माता भगिनींनी कुठल्याही एजंट मार्फत न जाता आपले अर्ज शासनाने सुचविल्या प्रमाणे करावे.अर्ज करण्याची अंतिम तारीख शासनाने 60 दिवसापर्यंत वाढवली आहे.’नारी शक्ती दूत’ या ऐप वर ऑनलाईन अर्ज करावे तसेच शासनामार्फत वेळोवेळी आलेल्या सूचना कळविले जाईल.महिला लाभार्थ्यानी कोणालाही चिरीमिरी देऊ नये ,योजनेचा लाभ मिळवुन देतो म्हणून कोणी पैश्याची मागणी करीत असेल तर तहसील विभागाशी संपर्क साधावा .
शासन या योजनेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला देत आहे तेव्हा कुठल्याही माता भगिनींनी कोणालाही पैसे देऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने काढले आहेत.तेव्हा कामठी तालुक्यातील तमाम पात्र माता भगिनींनी कागदपत्र सादर करून या योजनेत सहभागी होउन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांजल वाघ यांनी केले आहे.तसेच या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज गावागावात कॅम्प आयोजित करून प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरून घ्यावेत अशी मागणीही तहसिलदार कडे केली असल्याची माहिती माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी दिली.