नागपूर :- नागपूर शहरात जानेवारी महिन्यापासून ते १७ ऑक्टोंबर या दरम्यान २ मलेरियाच्या रुग्णांची आणि ५७ डेंग्यू रुग्णांची नोंद झालेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. तरी नागरिकांनी डेंग्यू-मलेरिया ताप सारख्या आजारांना न घाबरता सतर्कता बाळगत काळजी घ्यावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांना केले आहे.
मागील १० महिन्यात नागपूरात आढळल्या डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. डेंग्यू आणि मलेरियाची रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात मनापा प्रशासनाला यश आले आहे. याबद्दल समाधान व्यक्तकरीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराला रोखण्यासाठी दहाही झोन निहाय जनजागृती केल्या जात आहे. वेळोवेळी घरोघरांचे सर्वेक्षण केल्या जात आहे. संबंधित ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी केल्या जात आहे. याशिवाय नियमितपणे कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पी मासे सोडणे यासारखी सर्व उपाययोजना राबविल्या जात आहे. याचा परिणाम स्वरूप नागपुरात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत आहेत. तरी डासांपासून होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा हवा, नागरिकांना कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी आणि नागपूर महानगरपालिकेस किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता सहकार्य करावे, असे आवाहन ही राधाकृष्णन बी यांनी केले आहे.
खासगी रुग्णालयांनी मनापाला त्वरित माहिती दयावी
नागपूर महापालिकेतर्फे किटनाशक फवारणी, साचलेल्या पाण्यात गप्पीमासे टाकणे, किटकशास्त्रीय सर्वेक्षणाव्दारे डासांची अतिघनता असलेल्या ठिकाणी कार्यवाही, जनजागृती, या सर्व उपाययोजना नियमितपणे राबविल्या जात आहेत. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता, मलेरिया किंवा डेंग्यू तापाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क करुन औषधोपचार करावा. याशिवाय खासगी रुग्णालयांनी रॅपीड चाचणी व्दारे डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यास नागपूर महानगरपालिकेस त्वरित माहिती द्यावी व शासकीय मार्गदर्शक नियमानुसार तपासणी करुन पक्के निदान करण्याकरीता पाठवावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
Ø घराच्या सभोवताल अथवा छतावर भंगार साहित्य – टायर, नारळाच्या करवंटया, रिकामे डबे, पाण्याचे टाके, कुडया, कुलर ई. ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
Ø आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
Ø लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे.
Ø घरी असलेले सर्व कुलर बंद करून पाण्याची टाकी स्वच्छ पुसून कोरडी करावी.
Ø सभोवतालच्या परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे
Ø पाण्याची भांडी, टाकी, ओव्हरहेड टॅक, यावर कवर झाकावे.
Ø डेंग्यू सदृश्य ताप आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधुन वेळीच औषधोपचार करावा.