दिवाकर गोखले महानिर्मितीचे नवे संचालक(खनिकर्म)

नागपूर :- दिवाकर गोखले यांनी नुकतेच महानिर्मितीच्या संचालक(खनिकर्म) पदाचा कार्यभार स्वीकारला. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. गोखले यांनी खनिकर्म शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि एम.बी.ए.(एच.आर.) पदव्युत्तर शिक्षण  पूर्ण केले आहे. ते व्ही.एन.आय.टी. नागपूरचे माजी विद्यार्थी आहेत. कोल इंडियाच्या भूमिगत आणि खुल्या खाणीतील कोळसा उत्खननाच्या  संचालन आणि विविध तांत्रिक कामांच्या सुमारे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वेकोलिच्या उमरेड जिल्हा नागपूर येथून महाव्यवस्थापक (खाणकाम) म्हणून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.
कोळसा खाण प्रकल्पासाठी  वन आणि शासन यांचा समावेश असलेली जमीन संपादन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. वेकोलिच्या वणी (उत्तर भाग), नागपूर क्षेत्र आणि  उमरेड येथे क्षेत्रीय महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
विशेष म्हणजे वेकोलिच्या  उमरेड भागात फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी/सायलो प्रकल्प विकसित करण्यासाठी खाणींमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचे धोरण आखण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती.कोळशाच्या खाणींमध्ये जागतिक खाणकाम आणि कटिंग तंत्रज्ञान जसे कंटिन्युअस मायनर आणि सरफेस मायनरच्या अंमलबजावणीमध्ये ते  निपुण आहेत.
नवकल्पना साकारण्यात त्यांचा हातखंडा असून सावनेर,जिल्हा नागपूर येथील भूमिगत खाणीच्या पृष्ठभागावर १५ एकर क्षेत्रावर माईन  इको-पार्क विकसित करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” मध्ये राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सावनेर “इको पार्क” ची प्रशंसा केली आहे. खाण पर्यटनासाठी त्यांनी वेकोलि आणि  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत सामंजस्य करार देखील केला आहे. भारतात प्रथमच “खाण क्षेत्र २०२० मध्ये नाविन्यपूर्ण योगदान” अंतर्गत ६ व्या EPC जागतिक पुरस्कारांमध्ये कॅबिनेट मंत्र्याकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांनी कोळसा खाणींमधील सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर ऍनिमेशन आधारित माहितीपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन देखील केले आहे.
सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील वेकोली खाणी लगत गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत सुनिश्चित करून खाणीतून आर.ओ. प्लांटद्वारे प्रक्रिया केलेले पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करून  स्वयं-सहायता गटाला सहभागी केले  आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले.
वेकोलिच्या गोंडेगाव व भानेगाव ओपनकास्ट प्रकल्पात ओव्हरबर्डन  मधून रेती तथा माती वेगळे करण्याचा प्रकल्प सुरू केला,तसेच वीट निर्मिती प्रकल्पसुद्धा सुरू केला. वाळूचा लिलाव/विक्री करून वेकोलिसाठी अतिरिक्त महसूल निर्मिती केली. प्रधानमंत्री जन आवास योजनेसाठी नागपूर सुधार प्रन्यास समवेत वाळू करार केला.महानिर्मितीच्या खापरखेडा औ वि केंद्रासाठी वेकोलि च्या भानेगाव खाणीतून  प्रति मिनिटं ६५०० गॅलन इतक्या प्रमाणात विनामूल्य पाणी उपलब्ध करून देण्याचा करार केला.नागपूर परिसरात व्यावसायिक स्तरावर “कोल-नीर”  नावाने मिनरल वॉटर आणि बॉटलिंग प्लांटची स्थापना केली.
त्यांनी एशियन मायनिंग काँग्रेसमध्ये तसेच राष्ट्रीय स्तरावर (IIT-BHU, NIT रायपूर, NIT नागपूर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेबिनारद्वारे अनेक तांत्रिक पेपर सादर केले आहेत. २०२२ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असून भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाद्वारे नागपूर क्षेत्रामध्ये क्षेत्र महाव्यवस्थापकाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार तसेच खाणकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महानिर्मितीचे वीज उत्पादन आणि वित्तीय भाग मोठ्या प्रमाणावर कोळश्यावर अवलंबून असल्याने वीज उत्पादनासाठी आवश्यक कोळसा पुरवठा, उत्तम दर्जा आणि गरेपालमा खाण प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यात दिवाकर गोखले यांचा अनुभव कामी येईल असा विश्वास डॉ.पी. अनबलगन यांनी व्यक्त केला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कंत्राटी संगणक चालकांची किमान वेतनावर तत्काळ नियुक्ति करा

Wed Nov 2 , 2022
– मनपाच्या १८९ संगणक चालकांचे धरणे आंदोलन – कंत्राटी संगणक चालकांच्या हितासाठी RNCEA चा पुढाकार नागपूर  : नागपूर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक चालक म्हणून सद्यास्थितीत एकूण १८९ संगणक चालक कार्यरत असून नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळया विभागांमधे आपली सेवा देत आहे. या संगणक चालकांना तत्काळ किमान वेतनावर तत्काळ नियुक्ति करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद टिंगणे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!