नागपूर :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम येत्या २५ सप्टेंबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची पूर्व तयारीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांनी दिव्यांग व्यक्ती विषयक प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे पार पडली.
कार्यक्रमाचे नियोजन पाहण्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव अभय महाजन यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना राज्यातील दिव्यांगासाठी शासनाने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली. असे मंत्रालय स्थापना करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे हे विशेष.
नागपूर जिल्ह्यात या अभियानाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह व परिसर येथे करण्यात येणार असून यासाठी विविध विभागाच्या विभाग प्रमुखांना स्टॉल उभारून दिव्यांग व्यक्तींना अपेक्षित असलेला शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी “आठवड्यातून एक दिवस दिव्यांगांसाठी” हे अभियान जिल्हा प्रशासनाकडून येत्या काळात राबविण्यात येणार आहे. जेणेकरून दिव्यांगांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मदत केली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरुपात दिव्यांग लाभार्थ्यांना लाभांचे वितरण केल्या जाईल. परंतु या अभियाना नंतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी शाश्वत कार्यक्रम राबविण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न राहतील .या विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी करण्यात येणार आहे यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार व चर्मेाद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था आदींच्या मदत कक्ष – स्टॉल्सचा समावेश राहील. या कक्षांच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख आस्थापनामध्ये दिव्यांग व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या विभागांच्या योजनांचे एकत्रित माहिती पुस्तक तयार करण्यात आले असून यामध्ये दिव्यांग विषयक अधिनियम, विविध कल्याणकारी योजना आणि महत्वाच्या शासन निर्णयांची दिव्यांगजन उपयुक्त माहितीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी प्रत्येक विभाग प्रमुखांनी जिल्हास्तरावर दिव्यांग विषयक चालू असलेल्या योजनांची माहिती सचिवांना दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेमार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून तयार करण्यात आलेल्या “दिव्यांग उन्नती पोर्टल”, राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजना या योजनांची सचिवांनी प्रशंसा केली. नागपूर महानगर पालिकेकडून दिव्यांग व्यक्तींना पुरविण्यात येणा-या ई-रिक्षा योजना ही चांगली असून याची जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. यावेळी इतर विभागांचा आढावा घेण्यात आला.