– 18 मार्च पर्यंत नमुने सादर करता येतील
नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2024-25 चे आयोजन 20 मार्च 2025 रोजी सांयकाळी 5 वाजता प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. 2 सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयात करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, प्रादेशिक उपायुक्त, सीमा पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ट हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देवून विणकरांना गौरविण्यासाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने वस्त्रोद्योग कार्यालयात 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.