– प्रस्तावित पार्किंगची जागा समतल
– गवत काढणे, लाकडी कठडे बांधण्यास प्रारंभ
नागपूर :- प्रस्तावित अंडरग्राऊंड तयार करण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला असून, दीक्षाभूमी परिसराची जागा समतल करण्यात आली आहे, तसेच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी स्टेजचे कामही पूर्णत्वास येत आहे. परिसरात गवत कापून जागा समतल करण्यात येत असून, लाकडी कठडे बांधण्याचे काम सुरू झाले आहे.
धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्यासाठी देश- विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन केवळ १२ दिवस शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने युद्धपातळीवर कामाला गती देण्यात आली. सामाजिक न्याय विभाग, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेळेच्या आत जागा समतल केल्याने दीक्षाभूमीचा परिसर आधी सारखाच झाला आहे. आता धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध कामांना गती मिळाली आहे.
प्रस्तावित अंडरग्राऊंड पार्किंगसाठी दीक्षाभूमी परिसरात सहा मीटर खड्डा करण्यात आला होता. २० जुलै रोजी मुसळधार पावसाने आणि त्यानंतर सतत पाऊस पडल्याने खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचा उपसा करून जागा समतल करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एनएमआरडीएला निवेदन पाठविले होते. राज्य शासनाने तत्काळ दखल घेत सात दिवसांत पाण्याचा उपसा करून वेळेच्या आता खड्डा बुजवून परिसरातील जागा समतल केली. अलीकडेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त संजय मीना, भदंत ससाई यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी करून ३० सप्टेंबरपर्यंत काम करण्याचे निर्देश दिले होते.
सामाजिक न्याय विभागाचे आभार
प्रस्तावित अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेला खड्डा वेळेच्या आत बुजविण्यात आला. परिसरातील जागा समतल करण्यात आली. शासनाने वेळीच दखल घेऊन युद्धपातळीवर काम केल्याने सामाजिक न्याय विभाग, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मनपा आणि नासुप्रचे आभार.
– भदंत नागार्जुन सुरेई ससाई
अध्यक्ष दीक्षाभूमी स्मारक समिती