ताथवडे येथील स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, एसटीपी यासारख्या नियोजित नागरी सुविधा उभारणीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) विकसित करण्यासह त्या जमिनीवर वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा. त्या जमिनीचा मोबदला पशुसंवर्धन विभागास देऊन महानगरपालिकेने जमीन ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयात आज ताथवडे (जि.पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबतच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीस महसूल व पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ताथवडे परिसरासह पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात विविध उद्योग घटकांसह नवीन आयटी कंपन्याही येत आहेत. या सर्वांचा विचार करता ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्पाईन रस्ता आणि मलनिंस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकास आराखड्यात ताथवडे येथील जागेचा समावेश करण्यात आला आहे. या जमिनीवर नागरी सुविधांचे काही आरक्षण टाकण्यात आले आहेत. पीएमआरडीए क्षेत्राचा विचार करता ताथवडे येथील मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. आवश्यक असणारी जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यास पशुसंवर्धन विभाग सकारात्मक आहे. त्यामुळे महानगरपालिकेला आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधांसाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पशुसंवर्धन विभागास सादर करावा. पशुसंवर्धन विभागामार्फत जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला निश्चित करण्यात येईल. हा मोबदला भरून महानगरपालिकेने जमीन लवकरात लवकर ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ताथवडे परिसरासह पिंपरी-चिंचवड येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी वाल्हेकरवाडी चौक ते औंध-रावेत रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मीटर स्पाईन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरु करणे आवश्यक असल्याने जमीन हस्तांतर प्रक्रिया गतीने पार पाडावी. त्याचप्रमाणे येथील जमिनीवर २० एमएलडी क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भविष्यात जास्त क्षमतेचा प्रकल्प उभारावयाचा असल्यास मध्यवर्ती ठिकाणी जमीन मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यातील क्षमता वाढीच्या दृष्टीने अधिकची जमीन संपादित करून घ्यावी. या ठिकाणी स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, एसटीपी आणि इतर विकास कामांसाठी १३ एकर जागेचा प्रस्ताव आहे. आवश्यकतेनुसार आत्ताच या क्षेत्रफळात वाढ करून नवीन प्रस्ताव पाठवावा. महानगरपालिकेने या जागेच्या वापराचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात मुसळधार पावसाने शेतपिकाचे नुकसान, पिके गेले पाण्यात 

Wed Jul 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागिल 20 जुलै पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्याला चांगलाच फटका बसला ज्यामुळे नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले असून कामठी तालुक्यातील कामठी नगर परिषद क्षेत्र,कामठी,कोराडी, महालगाव,तरोडी,वडोदा या मंडळातील 27 गावे बाधित झाले असून तीन हजार च्या जवळपास नागरिकांच्या घरात पाणी शिरले तसेच कामठी मंडळातील चार व तरोडी गावातील 1 असे पाच घरे पूर्णता पडल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!