– महाराष्ट्राची एकूण तीन पदकांची कमाई
नवी दिल्ली :- मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात शुक्रवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली.
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेरणा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रोडवर चालू असलेल्या या स्पर्धेमधील १००० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या मयुरीने सुवर्णपदक आणि श्वेता गुंजाळने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. दिल्लीच्या त्रियशा पॉल हिला रौप्यपदक मिळाले.
३००० मीटर सांघिक परसूट प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संघात मयुरीसह सुशिकला आगाशे, वैष्णवी गभने, शिया लालवाणी आणि पूजा दानोळे यांचा समावेश होता. या शर्यतीत मणिपूरच्या संघाला सुवर्णपदक आणि हरयाणाच्या संघाला कांस्य पदक मिळाले.
महाराष्ट्राने ट्रॅक सायकलिंगमध्ये आतापर्यंत चार पदके मिळवली असून, मयुरीने गुरुवारी ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये कांस्यपदक पटकावले होते.