संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात समता सप्ताहनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
अमरावती :- समाजात सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती बाबासाहेबांनी घडून आणली. सांस्कृतिक कार्यक्रमातूनच समाजात सांस्कृतिक बदल शक्य असून भावी पिढीने अशा उपक्रमात पुढाकार घ्यावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने दिनांक 08 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी डॉ.के.जी. देशमुख सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, अॅड. अरुण रवराळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. सतोष बनसोड व कार्यक्रमाचे संयोजक श्री रमेश जाधव उपस्थित होते.
डॉ. मुन्द्रे पुढे म्हणाले, चांगली संस्कृती ही चांगल्या संस्काराची देणं आहे. मनावर चांगले संस्कार घडल्यास माणसात चांगले बदल घडतात. प्रत्येकाने महामानवांचे विचार मनात रुजवून उत्तम समाज निर्माण करावा. विद्याथ्र्यांनी अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमात जास्तीतजास्त संख्येने सहभागी होवून एक आदर्श समाज निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी करुन उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी त्यांनी महामानवांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणातून संचालक डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, समता सप्ताहाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या माध्यमातून महामानवांचे विचार विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम निरंतर सुरु आहे. अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात सांस्कृतिक बदल निर्माण होईल, असे सांगून त्यांनी समता सप्ताह पर्वासाठी शुभेच्छा दिल्यात.
सांस्कृतिक कार्यक्रमात भीमराया घे वंदना, छाती ठोकूनी हे सांगू जगाला, ना भाला-ना बर्ची-ना घाव, वाट किती मी पाहू येशील, साजरी भीम जयंती करु, चंदन वृक्षा समान होता, भीमरावांनी देशावरती प्रेम, जीवाला जीवाच दान दिलं, जरी झाला बॅरिस्टर-तरी पडला ना, माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू या गीतगायनाचे डॉ. राजीव बोरकर, रमेश जाधव, नरेंद्र खैरे, मोहन इंगळे, डॉ. चंदु पाखरे, रिया भुयार, पल्लवी सपकाळे आदींनी गायन केले. योगा प्रात्यक्षिकाचे सादरीकरण प्रा. शुभांगी रवाळे, प्रा. स्वप्नील मोरे, प्रा. स्वप्नील ईखार, प्रा. शिल्पा देव्हारे व प्रा. प्रफुल्ल गांजरे तसेच एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तुषार चव्हाण, आदित्य कनेरी, विशाल राऊत, आकाश ताडे, समीर शहा, पराग डफर, अळसपुरे यांनी उत्कृष्टरितीने केले.
सुरुवातीला कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकतेतून डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमामागील भूमिका मांडली. संचालन करीत आभार अभिजित इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.