काँग्रेस देशाचा विकास करूच शकत नाही – लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांची टीका

– मुल येथे व्‍यापारी मंडळ, सामाजिक संस्‍थांच्‍या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर :- काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी ते देशाचा विकास करू शकत नाहीत. देशाचा विकास करण्याची ताकद फक्त मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं मध्ये आहे. काँग्रेसला फक्त आणि फक्त दुष्‍ट प्रचार करता येते, देशाचा विकास करता येत नाही, अशी घणाघाती टीका चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

मुल शहरातील कन्नमवार सभागृहात व्‍यापारी मंडळ व शहरातील विविध सामाजिक संस्‍थांची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “र” पासून सुरू होणाऱ्या अक्षराने रावणाच्या अत्‍याचाराला “र” पासून सुरू होणाऱ्या रामाने संपविले आहे. “क” अक्षरापासून सुरू होणाऱ्या कंसाच्या अत्याचाराला “क” पासून सुरू होणाऱ्या कृष्णाने संपवीले आहे, हा इतिहास आहे. त्यामुळे आता “क” अक्षरापासून सुरू होणाऱ्या काँग्रेसला महायुतीचे “क” अक्षरापासून सुरू होणारे कार्यकर्ते संपविणार आहेत, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

कार्यकर्ता बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश पोटवार, शिवसेना आघाडीच्या महिला अध्यक्ष भारती राखडे, अर्चना सहारे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष रत्नमाला भोयर, नंदकिशोर रणदिवे, प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, विशाल नागुलवार, मुकेश गेडाम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोती टहलीयानी, यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नांदगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच सागर देऊळकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.

दिवंगत खासदारांनी शब्द पाळला नाही : मंगेश पोटवार

मुल तालुक्यात काँग्रेस पक्षाचे खासदार बाळू धानोरकर यांनी सभा घेऊन खासदार मानधनातून शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे आश्वासन आम्हाला दिले होते. त्यासभेचे प्रास्ताविक मी केले होते. आश्वासनांतर त्यांना आम्ही निवडून दिले होते. विजयी झाल्यावर त्यांनी आपल्या मानधनातून पिक विमा काढला नाही, दिलेला शब्द पाळला नाही. आम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावर विश्‍वास नाही, परंतु आता आम्हाला सुधीर भाऊंसारख्या चंद्रपूरच्या हिऱ्याला संसदेत पाठवायचे आहे. सुधीर मुनगंटीवार दिलेला प्रत्येक शब्द पाळतात. संपूर्ण देशामध्ये सर्वांत जास्त मतांनी आपण सर्व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष एकत्र येऊन सुधीरभाऊंना निवडून दिले पाहिजे तरच या लोकसभा क्षेत्राचा कायापालट होईल, अशी प्रामाणिक भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार गाजवतील देशाची संसद : संध्या गुरनुले

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा सुधीरभाऊंनी कायापालट केला आहे. जगभरात आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव त्यांनी झळकविले आहे. त्यांनी राज्य सरकारमध्ये आपल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. मग महिला बचतगटांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असो त्यांनी विधिमंडळात आवाज उठवून न्याय दिला आहे. आता त्यांना देशाच्या संसदेमध्ये पाठवून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा आवाज बुलंद करायचा आहे. आपण त्यांना या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतांनी विजयी केले तर संसदेमध्ये आपला जिल्ह्याचा आवाज गाजवतील, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी कार्यकर्ता बैठकीत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निर्मिक ग्रामीण विकास व बहुद्देशीय संस्थेच्या डायरेक्टर जया अंभोरे यांचा 500 च्या वर महिलांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

Tue Apr 16 , 2024
नागपूर :- समाज सेविका जया अंभोरे यांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात ५०० महिलानं सोबत भारतीय जनता पार्टीत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला . जया अंभोरे यांनी ठणकावून सांगितले राजकारणातून समाजकारण करण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला माझ्या संस्थेच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य करायचे आहे.महिलांसाठी विशेष योजना राबवायच्या आहेत आणि त्यासाठी मला काही अधिकार हवेत आणि हे अधिकार मला भाजप सारखे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com