– राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
नागपूर :- राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचार संहिता सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत परराज्यातील मद्याचा साठा जप्त केला आहे.
जरीफटका पोलीस स्टेशन नागपूर हद्दीत असलेल्या कोराडी रोड, ओम नगर येथील विजय धरमदास आसुदाणी यांच्या संत ज्ञानेश्वर सोसायटी प्लॉट कमांक 31 येथून हा मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व हरियाणा राज्यात विकी करीता असलेला हा मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात अवैधपणे विकीकरीता आणलेला होता. यात स्कॉच स्कॉच, वोडका व इतर मद्य होते. साठ्याचा मालक अमित भागचंद चेलानी हा तेथे त्याचे वाहनासोबत आल्याबरोबर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
वाहनाची तपासणी करून ज्या घरामधून स्कॉच मद्य आणले त्या घराची तसेच वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाच्या डिक्कीमध्ये व घरामध्ये महाराष्ट्र राज्यात विकीस प्रतिबंधीत असलेले व हरियाणा राज्यात विक्रीकरीता उपलब्ध असलेले विदेशी स्कॉच मद्याचा हा साठा होता.
यात मद्याच्या 448 सिलबंद बाटल्या तसेच वाहनासहित व जप्त केलेल्या मोबाईलसहित एकुण 38 लाख 69 हजार 431 रूपयांचा मुद्येमाल जप्त करीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या गुन्हयात वाहन चालक अमित भागचंद चेलानी, सहाय्यक राजकुमार हिरानंद रामदासाणी तसेच घरमालक विजय धरमदास आसुदाणी या तीन इसमांना मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली.
हा गुन्हा उघडकीस आणण्यात निरीक्षक मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक शिरीष देशमुख, समीर सईद व जवान सर्वश्री धवल तिजारे, अंकुश भोकरे, प्रशांत घावले यांनी विशेष परिश्रम घेतले. या गुन्हयाचा तपास विकम मोरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग, नागपूर हे करीत आहेत.
या कारवाईमध्ये उप अधीक्षक अतुल कोठलवार, निरीक्षक मोहन पाटील, आनंद पवार, जितेंन्द्र पवार, जयेंन्द्र जठार, बालाजी चाळणीवार, दुय्यम निरीक्षक सागर वानखेडे, सुरेश राजगडे, नकुल सोने व जवान ललीत जुमनाके, आशिष फाटे, रविंन्द्र इंगोले, अमोल जाधव, निलेश पांडे , सुलभा सातपुते, धनश्री डोंगरे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.