कलिना संकुलातील विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी समिती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात भोजन आणि पिण्याच्या पाण्याच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शासनामार्फत त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, समस्यांची तीव्रता लक्षात घेता विधान परिषद सभागृहातील सदस्य, विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि उपाययोजनांचा अहवाल तयार करून समस्या सोडविल्या जातील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य विलास पोतनीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. सदस्य सर्वश्री ॲड. अनिल परब, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, डॉ. मनीषा कायंदे आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री पाटील म्हणाले की, कलिना संकुलातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन आणि दूषित पाणी मिळत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेथे आपण भेट देऊन पाहणी केली आहे. त्यानंतर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहेत. दर्जेदार भोजन देण्यासाठी चांगला कंत्राटदार नेमला जाणार असून विद्यार्थिंनींकडून त्यांना परवडेल इतकीच रक्कम घेऊन उर्वरित रक्कम सीएसआर फंडातून भागविण्याबाबत विचार करण्यात येत आहे. भोजन आणि पाण्यासह विद्यार्थिनींच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करून प्रत्यक्ष भेटीत समस्यांचा आढावा घेतला जाईल आणि त्याबाबत उपाययोजनांचा अहवाल तयार करून सभागृहाला त्याबाबत अवगत केले जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या साहाय्याने राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत सूचना करताना निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून कालमर्यादेत त्याबाबतची कार्यवाही पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थिनींना त्यांच्या पसंतीचे भोजन मिळावे, तसेच त्यांना त्यांच्या समस्यांबाबत तक्रार करता यावी यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जे. जे. समूह रुग्णालयाच्या इमारत दुरुस्ती कामाचा पूर्ण मोबदला देणार  - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Sat Jun 29 , 2024
मुंबई :- जे. जे. समूह रुग्णालयाच्या आवारातील इमारतींच्या देखभाल दुरुस्तीच्या २०२३ पूर्वीच्या कामांपैकी ९० कामांची देयके देण्यात आली असून निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण झालेल्या उर्वरित कामांची देयके अदा करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले. निवासी डॉक्टरांच्या इमारतीच्या कामाबाबत फेब्रुवारी २०२४ मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीवर दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक यांना चौकशीस्तव आदेशित करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com