मुंबई :- लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) प्रकल्प बंद नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य रवींद्र वायकर, आदिती तटकरे, संग्राम थोपटे यांनी लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील सामूहिक सांडपाणी प्रकल्पाच्या साठवण टाकीतील गाळ काढण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) च्या साठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम जानेवारीमध्ये मे. लोटे परशुराम प्रायव्हेट एनव्हायरमेंट को – ऑप सोसायटीमार्फत सुरु करण्यात आले. काही कारणांमुळे गाळ काढण्याचे काम मंदावले असले तरी आता गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सांडपाणी प्रक्रिया करण्याचे काम सुरुळीत सुरु आहे. येणाऱ्या काळात राज्यातील सर्व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा आढावा घेण्यात येईल.