नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी सिव्हिल इंजिनियर्स फोरम, प्रोग्रेसिव्ह लॉयर्स फोरम, बाथ्री तेली समाज, जयभीम आर्मी संघटना आदी संस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.
ना.नितीन गडकरी यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी दररोज विविध संघटना पुढे येत आहेत. गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे पाऊल उचलले आहे, ते लोकहिताचे आहे. त्यामुळे आपण पाठिंबा दर्शवित असल्याचे पत्र विविध संघटनांनी
ना.गडकरी यांना दिले आहे. सिव्हिल इंजिनियर्स फोरमने समर्थन पत्रात म्हटले आहे की, ‘नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत नागपूरला मॉडर्न सिटीमध्ये रूपांतरित केले आहे. देशातील पायाभूत आणि दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यातही ना. गडकरी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी त्यांच्या विभागामार्फत आतापर्यंत सात विश्वविक्रम देखील नोंदविले आहेत. शहरातील अनेक इंजिनियर्सला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सारे नितीन गडकरी यांना समर्थन दर्शवित आहे,’ असे पत्र सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनने पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह ना.गडकरी यांना दिले आहे. प्रोग्रेसिव्ह लॉयर्स फोरमने देखील पत्राद्वारे आपले समर्थन दर्शविले असून निवडणुकीतील दमदार विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. जयभीम आर्मी आणि सहयोगी संघटनेने देखील ना.श्री.गडकरी यांना सक्रीय पाठिंबा दर्शविला आहे. संघटनेचे अध्यक्ष नितीन मोरे, महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक खरात, ब्ल्यू टायगर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी यासंदर्भातील पत्र ना. गडकरी यांना दिले आहे. याशिवाय नागपूर सरयू पारीण ब्राह्मण समाज, अखिल भारतीय बनिया समाज महापरिषद, बाथ्री तेली समाज, तेलगू संस्कृती संघटना, शहीद फाउंडेशन, जैसवाल शिक्षण समिती, श्री विश्वकर्मा वंशीय संघ, केसरवानी वैश्य कल्याण समिती, भोई सेना, माळवी सुवर्णकार संस्था, भारतरत्न डॉ. आंबेडकर विद्यार्थी मंच, मीना समाज बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र वैश्य संघ आदी संघटनांनी पत्राद्वारे समर्थन जाहीर केले आहे.