मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे :- अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी ठाणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे मंत्रालयातून सहभागी झाले होते. आमदार महेश शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, ज्ञानराज चौघुले, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, मृद व जलसंधारण आयुक्त मधुकर अरदड हेही दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते.

स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी – मुख्यमंत्री

पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी साठवणुकीची क्षमता वाढ होणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करावी. तसेच जलयुक्त शिवार टप्पा दोनची कामेही तातडीने सुरू करावीत. हे अभियान लोकचळवळ व्हावे, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सर्वाधिक प्रमाणात जलसंधारणाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालामध्येही जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक नोंदविला आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आता आपण राज्यात जलयुक्त शिवार टप्पा 2 राबवित आहोत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले

जलयुक्त शिवार योजनेसाठी 545 कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी 425 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या गावांतील कामांची देखभाल, दुरुस्तीची कामे ही या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तातडीने हाती घ्यावीत. तसेच दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व अटल भूजल योजनेतील गावांना प्राधान्य देण्यात यावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पावसाची कमी सरासरी व निसर्गाचा लहरीपणा पाहता जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या योजनांच्या कामांना प्राधान्य द्यावे. काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या टप्पा दोनमध्ये निवड झालेल्या गावांपेक्षा अधिकची गावे निवडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. गावांनी आराखडा तयार करून कामे सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी व त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण स्वतः करणार आहोत. पालकमंत्री यांनी आपल्या जिल्ह्यातील कामांवर लक्ष ठेवावे. सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण अधिकारी यांनी कामांचे नियोजन करावे, कामे दर्जेदार होतील हे पहावे. कुणीही कागदावर कामे न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

जलयुक्त शिवार लोकसहभागातून यशस्वी करावे – मंत्री शंभूराज देसाई

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करून यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा एक मध्ये केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करावी. नवीन कामे लोकसहभागातून करून हे अभियान व्यापक स्वरूपात यशस्वी करावे. या अभियानांतर्गत गाळमुक्त धरण अभियानाची व्यापक अंमलबजावणी करावी. धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांच्या मूळ साठवण क्षमतेत वाढ होईल. विविध स्थानिक स्वयंसेवी संस्थांची या अभियानासाठी मदत घ्यावी. सर्व जिल्हाधिकारी यांनी स्वतः संपूर्ण अभियानावर लक्ष ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्राधान्यक्रमाच्या कामाची यादी घेवून त्यानुसार कामाचे नियोजन करावे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू, त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता - क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

Wed May 17 , 2023
मुंबई :- गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National games), २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदक प्राप्त खेळाडूंना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com