दीक्षाभूमीवर 56 फूट उंच तथागत बुद्धाची चलितमुद्रा

– थायलंडच्या चोनबुरी शहरात झाली निर्मिती

– भदंत सुरेई ससाई यांची माहिती

– नासुप्र बनविणार चबुतरा, लवकरच मूर्तीची स्थापना

नागपूर :- मानव जातीला शांती, करूणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची चलितमुद्रेतील 56 फूट उंचीची भव्य मूर्ती नागपूरच्या दीक्षाभूमीवर आली असून लवकरच दीक्षाभूमीवर तिची स्थापना करण्यात येणार आहे. 1.7 टन वजन असलेली अष्ठधातूची ही मूर्ती थायलंड येथून समुद्रीमार्गे भारतात आली आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

बुद्धमूर्तीबाबत अधिक माहिती देताना ससाई म्हणाले, थायलंड आणि म्यानमार या दोन देशांतील दानदाते रिवाह खंजरनविस्थे व फादर ठेंगेयाल ठ्वेला यांनी बुद्धमूर्तीसाठी पुढाकार घेतला. थायलंड येथील चोनबुरी शहरात या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. मूर्तीचे 20 वेगवेगळे सुटे भाग असून चार कंटेनरमधून समुद्रीमार्गे मुंबईत आली. मुंबई ते नागपूर रस्तेमार्गाने प्रवास करीत मूर्ती दीक्षाभूमीवर पोहोचली आहे. या मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथील दानदात्यांच्या उपस्थितीत मागील वर्षी दीक्षाभूमी परिसरात भूमिपूजन सोहळा पार पडला होता. आता या मूर्तीची स्थापना करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासच्या सहकार्याने मोठा चबुतरा तयार करण्यात येणार आहे. चबुतरा तयार झाल्यानंतर सुटेभाग जोडून संपूर्ण मूर्ती उभी करण्यात येईल. मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथून इंजिनीअर येणार असून, यासाठी त्यांनीच डिझाइन पाठविले आहे. मूर्ती आणण्यासाठी डॉ. एस. के. गजभिये, रवी मेंढे यांचे सहकार्य लाभले. सध्या ही बुद्धमूर्ती भदंत ससाई आणि डॉ. सुधीर फुलझेले यांच्या देखरेखीत आहे.

देशात अशाप्रकारची पहिलीच मूर्ती

चलित मुद्रेतील तथागतांची मूर्ती देशात केवळ दोन ठिकाणी आहेत. हैदराबाद येथील हुसेन सागरात असलेली मूर्ती विशिष्ठ दगडाची आहे तर कामठी मार्गावरील नागलोकमध्येसुद्धा चलित मुद्रेतील मूर्ती आहे. मात्र दीक्षाभूमीवर आलेली मूर्ती ही पूर्णत: वेगळी असून तथागतांचा मागचा पाय चालत्या स्वरूपात आहे. त्यामुळे पाहणानार्‍यांना तथागत चालत असल्याचे दिसते. या मूर्तीचे संपूर्ण वजन मागच्या पायावर राहणार आहे. म्हणजेच देशात अशाप्रकारची ही पहिलीच मूर्ती असेल. चबुतरा तयार होताच क्रेनच्या मदतीने बुद्धमूर्तीची स्थापना केली जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएचडी फेलोशिपसाठी मुंबईत आंदोलन 

Wed Feb 7 , 2024
मुंबई :- अनुसूचित जातीतील 761 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना 2022 च्या नोंदणी दिनांक पासून बार्टी द्वारे सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी मागील सहा महिन्यापासून पुणे व मुंबई येथे धरणे, निदर्शने, उपोषण आदि प्रकारचे आंदोलन सुरू आहे. पुण्यात बार्टी कार्यालयापुढे शंभर दिवस आंदोलन चालले. तर मागील पंधरा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com