नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कोणताही नक्षल अथवा इतर कैद्यांना कोरोना संक्रमण झालेले नाही. कैद्यांच्या वैद्यकीय उपचाराकरीता एक मुख्य वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग ऑर्डरली इ. वैद्यकीय पथक 24 तास तैनात असते. त्यांच्यावतीने कैद्यांच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येते. तसेच कारागृहातील वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने विशेष आजारी असलेल्या कैद्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नागपूर तसेच इंदीरा गांधी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे तज्ञ डॉक्टरांकडे तपासणी व वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी पोलीस पथकामार्फत पाठविण्यात येते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कारागृह परिसरात मंगलमूर्ती लॉन यास तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आलेले असून कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना सदरच्या तात्पुरते कारागृह येथे सात दिवस क्वारंन्टाईन ठेवण्यात येते व त्यानंतर मुख्य कारागृहात दाखल करण्यात येते. कारागृह प्रशासनाच्यावतीने कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर शासनाच्या दिशानिर्देशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून कारागृहात कोणत्याही बंदी अथवा अधिकारी, कर्मचारी यांना कारोनाचे संक्रमण झालेले नाही, असा खुलासा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अ.म. कुमरे यांनी केला आहे