शिवराज्यभिषेकानिमित्त प्रत्येक तालुक्यात अद्यावत व्यायामशाळा निर्माण करा – वन, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

– ना.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक

– व्यायामशाळेसाठी तालुक्याला दिड कोटींचा निधी देणार

– सन 2024-25 साठी 357 कोटीचा प्रारुप आराखडा मंजूर

वर्धा :- छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे शिवराज्यभिषेक वर्ष आपण राज्यभर साजरे करतो आहे. यावर्षानिमित्त जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे अद्यावत व्यायामशाळा निर्माण करा. या व्यायामशाळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, यासाठी प्रत्येकी दिड कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात पालकत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.रणजित कांबळे, आ.डॅा.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.सागर कवळे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरूद्ध राजुरवार, जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

व्यायामशाळा बांधकामाला खर्चाची मर्यादा आहे. त्यासाठी शासन निर्णयात आवश्यक बदल करू. क्रीडा व बांधकाम विभागाने व्यायामशाळेसाठी प्रस्ताव सादर करावे. पुढील टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रत्येकी 25 लक्ष रुपये खर्चाच्या व्यायामशाळांचे बांधकाम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 241 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा कळविलेली आहे. या मर्यादेत विभागांकडून आलेल्या प्रस्तावांची छाणणी करून आराखडा तयार करण्यात आला. काही विभागांना निधी देणे गरजेचे असल्याने बैठकीत ना . मुनगंटीवार यांनी 357 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी दिली. हा आराखडा मान्यतेसाठी शासनास पाठविण्यात येणार आहे. त्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 300 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 43 कोटी व आदिवासी उपयोजना 14 कोटी रुपयांचा समावेश आहे.

शाळांना शौचालये, सुरक्षाभिंत या प्राधान्याच्या बाबी आहेत. जिल्ह्यात ज्या शाळांना सुरक्षाभिंत नाही अशा 46 शाळांचे खर्चासह प्रस्ताव करा. यासाठी जो निधी लागेल तेवढा निधी वार्षिक योजनेतून वाढवून देऊ. औद्योगिक प्रशिक्षण संस्था युवकांना रोजगार देणाऱ्या संस्था आहे. या संस्थांमधून कुशल मनुष्यबळ आणि चांगला रोजगार उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येतील.

आपत्कालीन प्रसंगी कार्डियाक ॲम्बूलन्स उपलब्ध असणे फार महत्वाचे आहे. या ॲम्बूलन्स खरेदीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. बरेचदा रुग्णवाहिकांसाठी डिझेलचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी खनिज विकास निधीतून निधी देता येईल, याची शक्यता तपासण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेत डिझल भरावे लागू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले.

जिल्ह्यात गावोगावी हॅन्डपंप आहेत, परंतू दुरुस्तीचे एकच पथक असल्याने हॅन्डपंप अनेक दिवस नादुरुस्त राहतात. त्यामुळे दुरुस्तीचे पथक वाढविण्यात यावे. कोणत्याही स्थितीती 24 तासाच्या आत दुरुस्ती झाली पाहिजे. यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास पुरुष बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कंत्राटी तत्वावर काम करुन घेण्यात यावे.

जिल्हा वार्षिक योजनेची कामे कालमर्यादेत झाली पाहिजे. कामांचा दर्जा उत्तम असावा, यासाठी विभागांनी विशेष काळजी घ्यावी. काही नाविन्यपुर्ण बाबींसाठी निधीची मागणी असल्यास तसे प्रस्ताव द्या, निधी उपलब्ध करून देण्यात येतील, परंतू निधी वेळेत आणि योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पालकमंत्री व मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा व यावर्षातील खर्चाची माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने तयार केलेल्या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. खा.रामदास तडस व आमदारांनी बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली.

पर्यटन, तिर्थक्षेत्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना मान्यता

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत क वर्ग पर्यटन क्षेत्र, तिर्थक्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली. क वर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये आयटीआय टेकडी ऑक्सिजन पार्क व आयटीआय टेकडी उमरी मेघेचा समावेश आहे. तिर्थक्षेत्रामध्ये विश्वशांती धाम श्री.संत सयाजी महाराज देवस्थान येळाकेळी, विठ्ठल रुखमाई व हनुमाम मंदीर देवस्थान कानकाटी, श्री.खाकीसाहेब देवस्थान सोरटा, संत गजानन महाराज मंदीर म्हसाळा, पीरचांद शहा अली ट्रस्ट समिती गवंडी, श्रीसाई बाबा देवस्थान आंजी मोठी, श्री. हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट भिसनूरचा समावेश आहे. वाढोणा, कानकाटी व शेकापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व मोहगाव, निमसडा, हळदगाव येथे उपकेंद्र प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार मिलिट्री स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Sun Jan 7 , 2024
नागपूर :-सी.पी.अ‍ॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिटरी स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच झालेल्या वसंतराव देशपांडे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी कर्नल एस.जे. मुजुमदार उपस्थित होते. कार्यक्रमाला सी.पी.अ‍ॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ए.एस.देव, सचिव अनिल महाजन, व शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावर्षीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!