– इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
नागपूर :- उत्तम आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांच्या आधारावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) हे केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशातील आघाडीचे हॉस्पिटल व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. मेयो रुग्णालयात आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ना.गडकरी बोलत होते.
मेयो हॉस्पिटल येथे रुग्णसेवेकरिता ५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच नवीन शव चिकित्सा गृह, प्रतिक्षा गृह, रुग्ण विभागाचा विस्तारित नोंदणी कक्ष या इमारतींचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘मेयो हे नागपूरच्या इतिहासातील सर्वात जुने हॉस्पिटल आहे. पूर्व, उत्तर, मध्य नागपुरातील गरीब रुग्ण याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. येथे ५०० खाटांच्या खाटांचे रुग्णालय भविष्यात उभे होईल, तेव्हा मोठ्या प्रमाणात गरिबांची सेवा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आयुष्यमान भारत योजनेचाही रुग्णांना लाभ मिळत आहेच. नवीन इमारतीमध्ये उत्तम सोयीसुविधा, पार्किंगची व्यवस्था, चोवीस तास पाणी, विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधायुक्त वसतीगृह, डॉक्टरांची निवास व्यवस्था आदींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.’ नागपुरातील तापमानाचा विचार करता संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित राहील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. नवीन प्लानमध्ये शेजारच्या मेट्रो स्टेशनला हॉस्पिटल जोडून घ्यावे; जेणेकरून रुग्णांना खासगी वाहनाने येण्याची गरज पडणार नाही, असेही ना. गडकरी म्हणाले. रहदारीच्या सोयीसाठी हॉस्पिटलपुढील रस्ता चारपदरी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘सिकलसेलच्या रुग्णांचा विचार करा’
सिकलसेल व थॅलेसिमिया ही नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भासाठी चिंतेची बाब आहे. मेडिकल, मेयो व एम्स या तिन्ही संस्थांनी मिळून सिकलसेल व थॅलेसिमियावरील अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार करावा. अवयव प्रत्यारोपण ते सिकलसेलपर्यंतच्या सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचाराची सुविधा असावी, अशी सूचना ना. नितीन गडकरी यांनी केली. त्याचवेळी रुग्णालयाच्या परिसरात कोणत्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत, यासंदर्भात माहिती घेऊन त्यादृष्टीने उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले.
५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन
५०० खाटांच्या इमारतीमध्ये उच्च दर्जाचे अपघात विभाग तसेच आठ प्रकारचे अतिदक्षता विभाग, लहान मुलांकरिता विशेष उपचार, सुसज्ज माता व बालरोग विभाग, सात शस्त्रक्रियागृहे, तसेच मध्यवर्ती प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग या सुविधा उपलब्ध असणार आहेत. रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार घेता येणार आहेत. १४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून याअंतर्गत ११ मजली इमारत उभी होणार आहे.