· जिल्ह्यात विकसीत भारत संकल्प यात्रेची सुरवात
· खासदार सुनील मेंढे यांनी दाखविली हिरवी झेंडी
भंडारा :- केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 17 योजनांची माहिती तसेच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज (दि.24) या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदा गवळी, पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशी कुमार बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन माणिक चव्हाण, मुख्याधिकारी नगरपरिषद विनोद जाधव व नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, सर्व गटविकास अधिकारी यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी उज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विलास सावंत, डी.एफ कोचे, परिमल गुजर, मनीष भाई खारा हे ही यावेळी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना मेंढे म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 541 ग्रामपंचायतींमध्ये आजपासून पुढील 60 दिवस विकसीत भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. सद्यस्थितीत 5 वाहने असून केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येईल. तसेच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे, अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुध्दा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाची अधिकारी सम्रत राही यांनी या योजनेबाबत जिल्ह्यातील नियोजनाचा आढावा घेतला होता. विकसित भारत संकल्प यात्रेमधून अद्यापही ज्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देणे हा उद्देश या योजनेचा असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त सर्वांना सामूहिक शपथ देण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेचे तालुका निहाय नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नोडल ऑफिसर यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
यात्रेची उद्दिष्टे : आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.