मुंबई :- मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेतकरी हिताच्या विकास कामांची माहिती देशातील २ लाख खेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे १२ फेब्रुवारीपासून ‘ग्राम परिक्रमा यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहिती किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.जगतप्रकाश चाहर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश प्रभारी बन्सीलाल गुर्जर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते. मोदी सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांवर चर्चा तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पपत्रासाठी शेतक-यांकडून सूचना व अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न या ग्राम परिक्रमा यात्रेतून केला जाणार असल्याचे चाहर यांनी यावेळी सांगितले.
चाहर यांनी सांगितले की, १२ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील सुखदेव आश्रमाजवळ होणा-या भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विशाल सभेने या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित रहाणार आहेत. गावागावांतून गाय, नांगर, ट्रॅक्टर व अन्य कृषी यंत्रांची पूजा करून यात्रेला सुरुवात होणार आहे. पुढे महिनाभर चालणा-या या यात्रेदरम्यान शेतक-यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती शेतकरी, शेतमजुरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. मोदी सरकारने शेतक-यांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेतकरी आत्मनिर्भर व समृद्ध होत आहे. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचा झालेला विकास, कॉंग्रेस सरकार आणि भाजपा सरकार यांच्या कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांपुढे ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन त्याबरोबरच घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या विविध योजना व विकासकामांची माहिती देणा-या पत्रकाचे वितरण केले जाईल. प्रगतीशील शेतक-यांचा, सैनिकांचा तसेच देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा यात्रे दरम्यान सन्मान केला जाणार आहे.
प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावांमध्ये ग्राम परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात येणार असून खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोक प्रतिनिधी, भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. वकील, डॉक्टर, माजी सैनिक यांनाही या यात्रेत आमंत्रित केले जाणार आहे, असेही चाहर यांनी नमूद केले.