पर्यटकासांठी निसर्ग माहिती केंद्र सुरू करा – विजयलक्ष्मी बिदरी

– बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य स्थानिक सल्लागार समितीची बैठक

नागपूर :- जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव, पक्षी, वृक्ष व जैवविविधतेची माहिती देण्यासाठी संबंधीत क्षेत्रात ‘निसर्ग माहिती केंद्र’ सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य येथील स्थानिक सल्लागार समितीची बैठक श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त चंद्रभान पराते, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याचे उपसंचालक सोनल कामडी, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश तोटे, पक्षीतज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे, डॉ. वसंत कहाळकर, संजय फुलकर, भाऊराव ठाकरे, आदी समिती सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

व्याघ्र दर्शनाच्या उत्सुकतेने येणाऱ्या पर्यटकांना संबंधीत जंगलातील वैशिष्ट्यांचीही माहिती दिल्यास पर्यटकसंख्येत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. निसर्ग माहिती केंद्रांसोबतच छायाचित्र, क्युआर कोड, जाहिरातफलक व समाजमाध्यमांद्वारे सदर माहिती देण्याचे नियोजन करावे. तसेच संबंधीत गाईड यांनादेखील याबाबत विशेष प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता वाढ करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. वनाबाबत अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी पक्षी गणणा करण्याचे तसेच छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्याचे त्यांनी सांगितले.

बंगडापूर व हिंगणी येथील प्रवेशद्वारातून सकाळ व दुपारच्या एकूण ६० सफारी सुरू करण्याच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. बोरधरण येथे शासकीय जागेवर वाहनतळ, मुलांसाठी उद्यान, फुलपाखरू बगीचा, पाण्यातील साहसी क्रीडाप्रकार, बोटींग, जेवण-नाश्ताचे स्टॉल यासोबतच पंचतारांकित सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.

सफारीसाठी नवीन वाहनांना परवानगी देतांना स्थानिकांकडील इलेक्ट्रिकल वाहनांना प्राधाण्य देण्याचे व वाहनखरेदीसाठी त्यांना कर्ज उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रकल्पालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स मध्ये 50 टक्के हरितउर्जेचा वापर करणे बंधनकारक करावे तसेच येथे ध्वनीप्रदुषण व विद्युत दिव्यांची प्रखर रोषणाई करणाऱ्यांवर तसेच वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अवैध बांधकामातून अडथळे निर्माण करणाऱ्या संबंधीतांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.

वनक्षेत्रात प्लॅस्टिकचा वापर पुर्णत: बंद करून पिण्याचे पाणी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीत पर्यटकांना उपलब्ध करून देण्याच्या त्यांनी सांगितले. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच स्थानिकांना गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राधान्याने उपलब्ध कराव्या.पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे, पर्यटन विकासाचा व प्रसिद्धीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

प्रारंभी बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत उपसंचालक मंगेश ठेंगडी यानी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तर उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याबाबत उपसंचालक सोनल कामडी यांनी माहिती दिली. उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथे मागील वर्षात 47 हजार पर्यटकांनी भेट देली असून त्यातून एक कोटी 17 लक्ष महसूल जमा झाल्याचे श्रीमती कामडी यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीला समितीचे पदाधिकारी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर, नैसर्गिक आपत्ती अध्ययन करण्यास सहकार्य करा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचे आवाहन

Sat Feb 10 , 2024
– नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपूर शहरातील पूर, नैसर्गिक आपत्ती, जोखीम, मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण यावर मनपात संयुक्त कार्यशाळा नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात येणाऱ्या विश्लेषण तसेच पूर, नैसर्गिक आपत्ती संदर्भात अध्ययन कार्यासाठी लागणारी अद्यावात माहिती देण्यसाठी सर्व विभागांनी महाराष्ट्र शासनातर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com