गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर :- भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली. भाजपा मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. आ. योगेश सागर, आ. पराग आळवणी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. आपण स्वतः अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक दिवस राहणार आहोत, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणा-या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजीं ची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात य़ेणार आहेत.

बावनकुळे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा ( ता. कळमेश्वर ) मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार हे गुरामवाडी (ता. मालवण), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रीही या अभियानात सहभागी होणार आहेत. शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे या अभियानात सहभागी होणार आहेत.

या अंतर्गत 50 हजार युनिट्समध्ये भाजपा चे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना 32 हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. प्रत्येक युनिटमध्ये भाजपा चा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल असेही बावनकुळे यांनी सांगितले.

50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने युवकांसाठी ‘नमो चषक’ तसेच महिलांसाठी ‘शक्ति वंदन कार्यक्रम’ देखील राबवण्यात येत आहे. लवकरच पंतप्रधान मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिवस संपन्न

Fri Feb 2 , 2024
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४८ वा स्थापना दिवस मुंबई येथील तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस ‘तटरक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अध‍िकारी, कर्मचारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com