नागपूर :- शहरात पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त वाहतुकीचा महापालिकेकडून मोठा कांगावा करण्यात आला. शहरातील आपली बसमधील ७० बस सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात आल्या. याशिवाय शहराला इलेक्ट्रिक बसही मिळाल्या. परंतु शहरात एकच सीएनजी पंप सुरू आहे. यातून केवळ २० बसला सीएनजी मिळत आहे. इलेक्ट्रिक बससाठी केवळ एकच चार्जिंग स्टेशन असल्याने १५ इलेक्ट्रिक बस देखाव्यासाठी उभ्या आहेत. कोट्यवधीच्या बस पडलेल्या स्थितीत असल्याने प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या उद्देशालाच सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
शहरात सध्या अडीचशेवर बस विविध मार्गावर धावत आहेत. शहर वाहतूक पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला. परंतु त्यासाठी आवश्यक सोयीसुविधाच उपलब्ध न केल्याने पर्यावरणपूरक वाहतुकीला तडे गेल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने जुन्या बसमधून ७० बसचे रुपांतर सीएनजी बसमध्ये केले. परंतु या बससाठी आवश्यक सीएनजी मिळत नसल्याने दररोज केवळ २० बस रस्त्यांवर धावत आहेत. एका खाजगी कंपनीकडून सीएनजी पुरविले जाते. मात्र शहरातील इतर सीएनजी वाहने तसेच बससाठी ऑटोमोटिव्ह चौकात एकच सीएऩची पंप सुरू आहे. सध्या सीएनजीचा तुटवडा असल्याने सीएनजीवरील वाहने खरेदी केलेल्यांनाही सीएनजी मिळत नाही. त्यातच महापालिकेच्या ५० बस दररोज उभ्या राहात आहेत. याशिवाय ऑगस्टमध्ये १५ तारखेला १५ इलेक्ट्रिक बस महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या. सध्या महापालिकेकडे ३१ इलेक्ट्रिक बस आहेत. यातील केवळ १८ बसेस सुरू आहेत. इलेक्ट्रिक बस खरेदीपूर्वीच चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज होती. परंतु चार्जिंग स्टेशन एकच आहे. त्यामुळे १३ इलेक्ट्रिक बस खितपत पडल्या असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडील दूरदृष्टीच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांच्या या बस आता उभ्या आहेत. यात येत्या काही दिवसांत स्मार्ट सिटीकडून आणखी २५ तर केंद्राकडून मंजूर झालेल्या नऊ, अशा एकूण ३४ इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे. परंतु चार्जिंग स्टेशन वाढविण्यासाठी कासवगतीने कामे सुरू आहे.
सीएनजी बसवरील खर्च पाण्यात
सध्या सीएनजीचा तुटवडा आहे. त्यातच शहरात एकच पंप असल्याने तुटवड्यात आणखीच भर पडली. त्यामुळे दररोज ५० बस उभ्या आहेत. मनपाच्या जुन्या बसचे रुपांतर सीएनजी बसमध्ये करण्यात आले होते. जुन्या बसचे सीएनजीमध्ये रुपांतर करण्यासाठी एका बसमागे चार हजारांचा खर्च आला. हा खर्च खाजगी कंपनीने केल्याने महापालिकेचे फावले. परंतु हा खर्च आता पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.
सीएनजी व इलेक्ट्रिक बसची सद्यस्थिती
एकूण सीएनजी बस : ७०
धावणाऱ्या सीएनजी बस : २०
एकूण इलेक्ट्रिक बस : ३१
धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस : १८