मुंबई :- राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. सगळा मनमानी कारभार सुरू होता, असं अशोक चव्हाण म्हणाले. निवडणुकांच्या अनुषंगानेही अशोक चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये तयारी नव्हती. काँग्रेसमध्ये कोणतेही बदल दिसत नव्हते. कितीकाळ स्वत:ची कोंडी होऊ द्यायची, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
चव्हाण यांच्या मनातील खदखद
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशाच ही आगामी लोकसभा निवडणूक कशी जिंकायची याची तयारी नव्हती. त्यामुळे ही निवडणूक कशी जिंकायची याची माझ्यासोबतच अनेकांना प्रश्न होता. सध्याची देशातील परिस्थिती पाहता आंदोलन करण्याची ही वेळ होती. असं असताना काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू होतं. या सर्व कार्यपद्धतीबाबत मी सूचना केल्या. पण त्याची दखल घेतली जात नव्हती. पक्षात टीमवर्क कुठेही दिसत नव्हतं. शेवटी किती वाट पाहायची? काँग्रेस पक्षात चांगले बदल दिसत नव्हते. स्वत:ची किती कोंडी होऊ द्यायची?, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.