राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित

शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा रविवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते भौतिक शास्त्रज्ञ व शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते वैज्ञानिक पद्मभूषण डॉ दीपक धर, पद्मश्री विजेते भिकूजी इदाते, झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार डॉ परशुराम खुणे, कुष्ठरुग्ण सेवक गजानन माने, पत्रकार व विचारवंत रमेश पतंगे, संगीत नियोजिका कुमी नरिमन वाडिया व भरतनाट्यम गुरु पद्मश्री कल्याणसुंदरम यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जागतिक हवामान बदलांमुळे अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला असून खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात व्यापक संशोधनाची गरज आहे, असे सांगून शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. 

स्थापनेपासून गेल्या ६३ वर्षांमध्ये राज्याने सामाजिक, आर्थिक व मानव विकास निर्देशांकात लक्षणीय प्रगती केली असून आज राज्य १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच सांस्कृतिक राजधानी देखील असून राज्याने संगीत, नृत्य, ललित कला, लोककला, आदिवासी कला व इतर कला व साहित्य क्षेत्रात देशाला नेतृत्व प्रदान केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य तसेच दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना आज देखील मार्गदर्शक आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील सर्व पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राज्यपालांनी वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. 

शेअर बाजार तज्ज्ञ दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या वतीने त्यांच्या पत्नी  रेखा झुनझुनवाला यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन रामचंद्र बहिर याचा देखील सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा परिचय असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

रनाळा येथे 'जागतिक पर्यावरण ' दिन साजरा..

Mon Jun 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – युवा चेतना मंच व सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर व नेहरू युवा केन्द्र यांच्या संयुक्त विद्ममाने ‘जागतिक पर्यावरण दिनाचा ‘ कार्यक्रम विठ्ठल रूक्मीणी मंदीर रनाळा येथे केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय प्रमुख संजय तिवारी , कामठी पंचायत समीतीच्या सभापती दिशाताई चनकापुरे , नेहरू युवा केन्द्र चे जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com