मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होणार

– गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण

– ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई :-  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

नुकताच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रवींद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

राज्य शासनाने नेहमीच मराठी चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी सोडविण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून या क्षेत्राला मदतीची भूमिका घेतली आहे. चित्रपटांसाठीचे रखडलेले अनुदान हा महत्वाचा विषय तातडीने मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गी लावला. चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या वेळेत मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय, या क्षेत्रातील विविध कला घटकांसाठी देण्यात येणारे पुरस्कार वेळेत देण्यासंदर्भातील वेळापत्रक तयार केले आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षातील पुरस्कारही यावर्षी देण्यात येणार असून यापुढील काळात प्रत्येक पुरस्कार हा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या दिनांकाला प्रदान करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी ठरवले आहे. या सर्व पुरस्कारांच्या रकमाही दुप्पट केल्या आहेत. तसेच गोरेगाव आणि कोल्हापूर येथील चित्रनगरीच्या विकासातील सर्व अडथळेही दूर केले असून या दोन्ही ठिकाणी आता चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठीच्या आवश्यक सोयी सुविधा एकाच ठिकाणी व सहजतेने एक खिडकी योजनेतून उपलब्ध होणार आहेत. तसेच राज्यभर कोठेही शासकीय व सार्वजनिक जागा चित्रिकरणाकरता आता निःशुल्क उपलब्ध करून देण्याचाही निर्णय मंत्री मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी वितरित - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Mon Feb 19 , 2024
मुंबई :- वाराणशी, हृषीकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या “गोदा आरती” उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com