दाभा-१/दाभा-२ व गिट्टीखदान जलकुंभाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

– अमृत योजनेअंतर्गत जलकुंभाची निर्मिती 

– मनपा तयार करणार ३२ जलकुंभ

नागपूर  :-केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दाभा-१/दाभा-२ व गिट्टीखदान येथे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याचे लोकार्पण शनिवार (ता.२५) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी. मनपाचे मुख्य अभियंता राजू गायकवाड, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वेपकॉसचे मनोज कुमार, माजी महापौर माया इवनाते, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, संजय बंगाले,  भूषण शिंगणे, रमेश चोपडे, प्रगती पाटील, अर्चना पाठक,  संगीत गिर्हे, दर्शनी धवड, परिणीती फुके, सुनील हिरणवार,  विक्रम ग्वालवंशी यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम दाभा-१/दाभा-२ चे लोकार्पण केले. नंतर योगेंद्र नगर येथील श्री. हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमात गिट्टीखदान जलकुंभाचे लोकार्पण केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे ज्या शहरानी २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविली आहे. सध्या निम्म्या शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळत आहे. तसेच नागपूर महानगरपालिकेला सांडपाण्यातून उत्पन्न मिळत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

शहराला कचरा मुक्त, प्रदूषण विरहित करण्याचा मानस असल्याचे सांगत नितीन गडकरी म्हणाले की, नागपुरात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. शहारला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत येत्या पावसाळ्यात आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी नागरिकांना यावेळी केले.

कार्यक्रमात बोलताना आमदार विकास ठाकरे यांनी या जलकुंभामुळे भर उन्हाळ्यातही नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा होणार असल्याने मनपाचे अभिनंदन केले. तसेच आमदार प्रवीण दटके यांनी शहारत झालेल्या जी २० अंतर्गत असणाऱ्या सी २० शिखर परिषदेदरम्यान मनपाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच फुटाळा येथील फाउंटन शो मुळे विदेशी पाहुण्यानसमोर नागपूर शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे दिसून आले असेही दटके यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी केले. त्यांनी सांगितले की, अमृत योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण, बळकटीकरण व विस्तारीकरण केल्या जात आहे. पुढील काळात शहरात ३२ जलकुंभ तयार करण्यात येणार असून यातील पाच जलकुंभ तयार झाले आहेत. गिट्टीखदान जलकुंभ हा मनपाने स्वतः तयार केले असून त्यामुळे या भागातील 20,000 नागरिकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय दाभा-१/दाभा-२ जलकुंभामुळे मनोहर बिहार, चिंतामण नगर, भिवसन खोरी, दाभा बस्ती, जगदीश नगर, गंगा नगर, काचिमेट व अमरावती रोड वरिल वसाहत अशा एकूण 27 ले आऊट मधील पाणी पुरवठयात वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात नविन नेटवर्क टाकण्यांत आला आहेत, त्यापैकी प्रामुख्याने सुख सागर सोसायटी, शिवनगर, भाकरे लेआऊट, ओशोपुरम सोसायटी, दयाशंकर सोसायटी इत्यादी असे एकुण 12 नविन लेआऊट मधे पाणी सुरू होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com