नवसंकल्पनांची मांडणी आत्मविश्वासाने करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा अंतर्गत प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण

राज्यस्तरीय सादरीकरणासाठी तीन नवसंकल्पनांची निवड

डॉ. दिलीप गोरे यांची नवसंकल्पना ठरली सर्वोत्कृष्ट

नागपूर :- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेला नागपूर जिल्ह्यात विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी आपल्या नवसंकल्पनांची प्रभावी मांडणी करून राज्यस्तरावरही यश संपादन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राच्या (बूट कॅम्प) उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर बोलत होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अनंत सोमकुवर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, अभय देशमुख, उद्योजक प्रशांत अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत विविध घटकातील लोकांनी सहभाग घेतला असून यामधून चांगल्या नवसंकल्पना पुढे येतील, तसेच त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आपली संकल्पना बक्षीस मिळविण्यासाठी अपयशी ठरली तरी खचून जावू नका. शासनाच्या योजनांचा लाभ घेवून ही संकलना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही डॉ. इटनकर यांनी यावेळी केले.

स्टार्टअप यात्रा उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण संकल्पना समोर येण्यास मदत होणार असून त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना नवीन दिशा मिळणार आहे. आपली नवसंकल्पना समाजासाठी अधिकाधिक उपयुक्त असावी, याकरिता सर्वांनी आग्रही राहावे. तसेच सादरीकरणानंतर नवसंकल्पनांच्या मूल्यांकनाकडे सकारात्मकतेने पाहून त्यातील त्रुटी दूर कराव्यात. पुन्हा नव्याने आपल्या नवसंकल्पना मांडाव्यात, असे आवाहन गोतमारे यांनी यावेळी केले.

स्टार्टअप यात्रेमुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात विविध घटकातून नवसंकल्पनांची मांडणी होवू लागली आहे. या उपक्रमामुळे राज्यात स्टार्टअप संस्कृती रुजण्यास मदत होणार असून सहभागी विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल, असे  कुंभेजकर यांनी सांगितले. तसेच आपल्या नवसंकल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कोणते अडथळे येवू शकतात, याचाही अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात हरडे यांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उपक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात व्यापक जनजागृती केल्यामुळे जिल्ह्यातून विक्रमी 178 नव संकल्पनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी, ऊर्जा, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता आदी क्षेत्रांतील नव्या व्यवसाय संकल्पनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. देवतळे, देशमुख, अग्रवाल यांनी यावेळी उपस्थितांना नवसंकल्पनांच्या प्रभावी मांडणीविषयी मार्गदर्शन केले.

तीन उत्कृष्ट नवसंकल्पनांची निवड ; राज्यस्तरीय सादरीकरणात होणार सहभागी

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरणामध्ये डॉ. दिलीप गोरे यांच्या नवसंकल्पनेला 25 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी शाश्वत विकास क्षेत्रातील नवसंकल्पना सादर केली. शिक्षण क्षेत्राविषयीची शुभम पाटील आणि अश्विन नवंगे यांच्या नवसंकल्पनांना अनुक्रमे द्वितीय (15 हजार रुपये) आणि तृतीय (10 हजार रुपये) क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या नवसंकल्पनांचे 17 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरावर सादरीकरण केले जाणार आहे.

नवसंकल्पना सादरीकरणाच्या परीक्षणासाठी 28 परीक्षकांची नोंदणी झाली होती. सर्व परीक्षक आणि नवसंकल्पना सादरीकरणात सहभागी उमेदवारांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष कुदळे यांनी केले, जिल्हा समन्वयक योगेश कुंटे यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुकान माणुसकीचे ‘माणुसकीचं आधार केंद्राचे’ मनपा आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

Sat Oct 15 , 2022
दिवाळी साहित्य विक्रीतून मिळणार भिक्षेकऱयांना रोजगाराच्या संधी नागपूर :- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकरी ना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन व सह्याद्री फ़ाऊंडेशन ने पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने लागणारे गृह सजावट साहित्य जसे आकाशदीवे, पणत्या, लाईट सिरिज आदि वस्तु तयार करण्याचे स्किल ट्रेनिंग ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!