मुंबई :-सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पाठविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. या योजनेचा आज राज्यात मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या लाभार्थ्यांना आज मंजुरी आदेश मिळत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा. महावितरणतर्फे मोहीम स्वरुपात ही योजना राबविण्यात यावी. जास्तीत जास्त ग्राहकांना योजनेचा लाभ होण्यासाठी योजनेबद्दल जनजागृती करावी.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी योजनेची माहिती दिली.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे.
या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल ॲप ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरण राज्यातील ग्राहकांना मदत करते. महावितरणच्या पुढाकाराने यापूर्वी राज्यात १,३८,००० ग्राहकांनी रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता १९०० मेगावॅट आहे. यामध्ये एक लाख घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.